अकोला : सध्या शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. त्यासाठी सध्या राज्यभरात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे ती बियाणे खरेदीची. मागच्य काही वर्षांत राज्यभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथी बोगस, अप्रमाणित आणि बनावट बियाणे मारण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आलेत. यासोबतच मागील काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.
'बियाणे असेल दमदार, तर पिक येईल जोमदार', अशी 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ' अर्थातच 'महाबीज'ची टॅगलाईन आहे. शेतीच्या मुळ सुत्रांमधील बियाणे हा सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. आर्थिक आणि नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मागील काही वर्षात बाजारात मिळणाऱ्या बोगस बियाण्यांचा फटका सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारून यातून कोट्यावधींची उलाढाल दरवर्षीच होत असल्याचं चित्र सर्रासपणे पहायला मिळतं. यापासून सुटका करून घेतांना शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना काही सावधानता बाळगल्या तर शेतकऱ्यांना होणारं नुकसान टाळता येईल. बियाणे घेतांना नेमकं कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आम्रपाली आखरे यांनी 'एबीपी माझा'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळेच चांगलं आणि प्रमाणित बियाणं निवडण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे पाहूयात.....
बियाण्यांची निवड :
बियाणे घेतांना नेहमीच या विषयांतील तज्ञ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ किंवा कृषी विभागातील जबाबदार व्यक्तीचं मार्गदर्शन जरूर घ्यावं. त्यांच्याकडून नवे वाण, सुधारित वाण आणि संकरीत वाणांची माहिती घ्यावी. बियाणे खरेदी करतांना ते नावाजलेल्या आणि विश्वासाहार्य कंपनीचेच असावे यासाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरावा. यासोबतच अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे आणि निविष्ठांची खरेदी करावी. कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तिथून बियाणे खरेदीला प्राधान्य द्यावे. बियाण्याच्या पिशवीला प्रमाणीकरण यंत्रणेने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी असणारी टॅग लावलेला असतो, तो तपासून पहावा. बियाण्याच्या बॅगवर माहिती छापलेली असते. त्याविषयी माहिती व्यवस्थित वाचून तपासून घ्यावी. बियाणे खरेदी करताना हा टॅग खूप महत्त्वाचा असतो.
बियाण्यांचे प्रकार :
शास्त्रज्ञांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण हे अधिक उत्पादन आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. ते शेतकऱ्यापर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावं यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यात घेतले जाते. त्यामध्ये 1. मूलभूत बीजोत्पादन 2. पायाभूत बीजोत्पादन, 3. प्रमाणित बीजोत्पादन आणि 4. सत्यप्रत बीजोत्पादन असे टप्पे आहेत. यालाच बियाण्याचे प्रकार असेही म्हणता येईल.
बियाण्यांच्या बॅगवरील 'टॅग'चे महत्व :
अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतिच्या कमीत कमी मूल्यांचा दर्जा दाखवणारी माहिती टॅग असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे टॅग प्रमाणित करण्यात आले आहेत. यामध्ये पायाभूत बियाण्यासाठी पांढरा, प्रमाणित बियाण्यांसाठी निळा, मूलभूत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाचा 'टॅग' लावलेला असतो. सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. त्यावर खालील माहिती असणे आवश्यक आहे.
1.पिकाचे नाव
2. जाती आणि प्रकार
3. गट क्रमांक
4. बीज परीक्षणाची तारीख
5. उगवणशक्ती टक्के
6. शुद्धतेचे प्रमाण
7. पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन
8. बियाण्याचा वर्ग
9. बियाण्याचा सार्थ कालावधी
10. विक्रेत्याचे नाव आणि पत्ता
11. बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची सही आणि हुद्दा याचा समावेश असतो.
याशिवाय बियाण्यास कीड किवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. कीडनाशकाची नावे ठळक अक्षरात आणि माणसे, जनावरे, पक्षी यांच्या खाण्यास अयोग्य असा खुलासा त्यात असला पाहिजे.
बियाणे खरेदी पावतीचे महत्व :
'टॅग'वरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडून बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे. या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी. पुढे जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जाऊ शकत नाही.
बियाण्यांसंदर्भातील तक्रार आणि निवारण :
पेरणीनंतर 'टॅग'वरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास अथवा पिकात फार मोठ्या प्रमाणात भेसळ आढळल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नियुक्त केलेले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडे शेतकरी तक्रार करू शकतात. बियाणे साधारणत: 4 ते 7 दिवसात उगवते. यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. पेरणीनंतर टॅगवर नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा उगवण कमी आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे नमुन्याची तपासणी करण्यास तक्रार करावी. तालुका स्तरावर चौकशी समिती असून तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतांना शेतकऱ्याने चौकशी समितीस बियांण्यांबाबतची संपूर्ण माहिती द्यावी.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहीतीचा पाठपुरावा केल्यास शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणूकीला मोठा आळा बसेल. यासोबतच दर्जेदार आणि अधिकृत बियाण्यांची लागवड केल्यास उत्पन्नात निश्चितपणे भर पडेल हे निश्चित....