सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेची प्रशासनाडून दखल घेण्यात आली असून जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकाराबरोबर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा उद्या पासून 31 ऑगस्टपर्यत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील पर्यटनाला आता 'ब्रेक' लागणार आहे. 


 तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर झालेल्या दुर्घटनेनंतर आता साहसी जलक्रीडा, प्रवासी होडी वाहतूक सेवा 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने प्रवासी वाहतुकीसाठी मुदतवाढ मागितली आहे. मात्र मुदतवाढ देण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी घेतील असे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी माहिती दिली आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, दांडी, कुणकेश्वर, देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाची गर्दी असते. स्कुबा, बनाना राईड, जेट की, पँरासिलिंग या साहसी समुद्री खेळाचा पर्यटक आनंद लुटण्यासाठी सिंधुदुर्गला भेट देतात . त्यामुळे पॅरासेलिंग किंवा साहसी खेळ हे प्रशिक्षित आणि सर्टीफाइड अॅडव्हेंचर स्पोर्ट कंपन्यांसोबतच केले पाहिजे. तसेच प्रवास करताना पर्यटकांनी लाईफ जॅकेट वापरले पाहिजे.


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटन हंगाम संपत आल्याने अनेक पर्यन व्यावसायिकांनी नौका किनाऱ्यावर आणण्यास सुरूवात केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समुद्राला भरती येते त्यामुळे पर्यटनास बंदी असते. 


 प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून बोट मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बोटीची प्रवासी क्षमता किती होती, या सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते का हे तपासण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्घटनेत कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर चालक आणि मालकावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.


संबंधित बातम्या :