मुंबई : अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालीसाचे जर कुठेही वाचन केलं तर तिथं येऊन जीवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तींकडून देण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी या संदर्भात दिल्लीतील पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्याने राणा दाम्पत्याला कोठडीत जावे लागले. दोन दिवसात तब्बल 11 वेळा अज्ञात व्यक्तीकडून फोन येत असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मी या पत्रामुळे घाबरले आहे. मी मानसिकदृष्ट्या खचले असून घाबरले आहे. या पत्रामुळे माझ्या घरात देखील भीतीचे वातावरण आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की, या धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात तो ही चूक पुन्हा करणार नाही. 




जेलवारीनंतर प्रथमच राणा दाम्पत्य 28 मे रोजी  विदर्भात दाखल होणार आहे.  राणा दाम्पत्याचे नागपूर विमानतळावर भव्य स्वागत केले जाईल असे युवा स्वाभिमान पक्षाने जाहीर केले आहे. नागपूर विमानतळावरून राणा दाम्पत्य रामनगर येथील हनुमान मंदिरापर्यंत रॅली स्वरूपात पोहोचतील आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह सामूहिक हनुमान चालिसा पठण करणार आहे. या सामूहिक हनुमान चालिसा पठणाकरिता नागपूर पोलिसांना परवानगी मागितली असून अजून परवानगी मिळालेली नाही असे ही युवा स्वाभिमान पक्षाने सांगितले आहे.


नागपुरात हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राणा दामपत्य कार्यकर्त्यांसह अमरावतीला रवाना होतील. अमरावती जिल्ह्यात तिवसा, मोझरी नांदगावसह अमरावती शहरात अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होणार असून रात्री 9 वाजता अमरावती येथील दसरा मैदान जवळच्या हनुमान मंदिरात पुन्हा हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. दरम्यान राणा दाम्पत्याने विदर्भात 1 लाख हनुमान चालिसा वाटप करण्याचे निर्धार  केले आहे. विशेष म्हणजे 28 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही राम नगर परिसरातील त्याचा हनुमान मंदिरात महागाई संदर्भात हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर केले आहे.  त्यामुळे युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रामनगर येथील मंदिरात समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.