Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील झाल्टा फाट्याजवळील एका लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकत ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गुजरातच्या दोन तरुणींसह सहा पीडितांची सुटका करीत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नींविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 16 मे रोजी रात्री ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. योगेश तुकाराम भुमे (वय 30) आणि त्याच्या पत्नीचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाल्टा फाट्याजवळ निपानी रस्त्यावर योगेश लॉज अॅन्ड बोर्डिंग आहे. आरोपी योगेश भुमे त्याचे व्यवस्थापन सांभाळतो. या लॉजमध्ये परराज्यांतील तरुणींना आणून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खबर ग्रामीण पोलिसाच्या दामिनी पथकाच्या सहायक निरीक्षक आरती जाधव यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक मनीष कलवानियांच्या आदेशाने चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यासह घटनास्थळी छापा मारला. ज्यात गुजरातच्या दोन तरुणींसह सहा पीडितांची सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर योगेश भुमे याच्यासह त्याच्या पत्नीच्या विरोधात चिखलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डमी ग्राहक पाठवून वेश्याव्यवसाय चालतो का? याची खात्री केली.
झाल्टा फाट्याजवळ निपानी रस्त्यावर योगेश लॉज अॅन्ड बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास डमी ग्राहक लॉजमध्ये पाठविला. तसेच पोलिसांनी दिलेल्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा घेऊन डमी ग्राहक लॉजवर गेला. तेव्हा त्याला तेथे आरोपी महिला भेटली. त्याने तिच्याकडे शरीरसंबंधासाठी महिलेची मागणी केली, तेव्हा तिचा पती योगेशही तेथे उपस्थित होता. त्यांनी डमी ग्राहकासमोर चार महिला उभ्या केल्या. तर पसंत पडलेल्या एकीसह ग्राहकाला लॉजमधील रूममध्ये पाठविले. त्यानंतर ग्राहकाने बाहेर येऊन दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला आणि पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. तेव्हा तेथे परराज्यातील तरुणींसह चार जणी आढळल्या. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून रोख 13 हजार 190 रुपये आणि इतर साहित्य असा 61 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: