Marathwada Rain Update: मराठवाड्यात (Marathwada) शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली असतानाच, आज दुसऱ्या दिवशीही विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) करंजखेड आणि पिशोर परिसरात गारपीट पाहायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरसह लातूर, हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात देखील आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट...


शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान सोयगाव आणि अजिंठा लेणी परिसरात जोरदार पावसासह गारपीट झाली होती. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. करंजखेड आणि पिशोर परिसरात जोरदार पावसासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर फळबागांना देखील याचा फटका बसला आहे. 


हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी  


हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसासह मोठ्याप्रमाणामध्ये गारपीट झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज आणि खरबूज यासह आंब्याच्या बागा असलेल्या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाला आहे. शेतातील गहू, ज्वारी, टरबूज यासह हरभरा हे पिके आता काढणीला आली होती. परंतु जोरदार झालेल्या गारपिटीमुळे शेतातील या पीकांना फटका बसला आहे. 


सलग तिसऱ्या दिवशी परभणीत अवकाळीचा कहर 


अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र असून, आज सलग तिसऱ्या दिवशी परभणीत अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळाला आहे. आज दुपारी दोन वाजेनंतर परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पुर्णा, सेलु तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झालाय. तर गंगाखेड, सेलु, सोनपेठ तालुक्यात गारपीट झाल्याने काढलेले आणि काढणीसाठी आलेल्या गहू, ज्वारी या पिकांसह टरबूज, खरबूज, आंबा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खरिपांनंतर रब्बीतही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत. 


लातूर ग्रामीणमध्ये गारपीठ


आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील रेणापूर, पानगाव, टाकळगाव, मोहगाव, तळणी गावाच्या शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी तुफान गारपीट झाली आहे. गारांचा आकार हा लिंबा एवढा होता. त्यामुळे घरावरील पत्रेच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. तसेच अनेक ठिकाणी गारांचा खच दिसून येत होता. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे सर्वत्र सर्वत्र थंड वारे वाहत आहेत. सततच्या पाऊस आणि वाऱ्यामुळे काढणीला आलेली गहू, ज्वारी, हरभरा आणि करडी सारखी पिके हाताची गेली आहेत. तर द्राक्षाच्या मोठ्या बागा आणि केशर आंब्याच्या बागा असलेल्या भागांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. काल मध्यरात्रीपासून निलंगा आणि निलंगाच्या आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आता दिवसा लातूर ग्रामीण भागातील अनेक गावात गारपीठ झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी