18th April Headlines: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडत आहेत. आजही दिवसभरात राजकीय घडामोडी घडण्याच अंदाज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या इफ्तारमध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आदींसह आमदार, अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
दिल्ली
- आज समलिंगी विवाहाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. समलिंगी विवाहाची मागणी हा निव्वळ शहरी आणि उच्चभ्रू वर्तुळातला सामाजिक मुद्दा आहे. घटनापीठाच्या सुनावणी आधी केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला होता.
- कर्नाटकात मुस्लिमांना दिलेले 4 टक्के आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
- बिलकिस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटके विरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
मुंबई
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलंय. याला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महाविजय 2024 ची पहिली सभा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
- शिंदे सरकार आमदार निधी वाटपात दुजाभाव करतंय, असा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. राज्य सरकार आज नव्यानं आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार.
पुणे
बारामती - पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव उरसळ यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण शरद पवारांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, विजय शिवतारे, संजय जगताप उपस्थित रहाणार आहेत.
- शरद पवार देहू मध्ये आयोजित किर्तन- प्रवचन कार्यशाळेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत.
सातारा
- आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेनंतर उदयनराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.
कोल्हापूर
- कोल्हापुरात मनसेच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे अजूनही जमा न झाल्यामुळे मनसे आज जिल्हाधिकाऱ्यांना वर्ल्डकप भेट म्हणून देणार आहेत.
रत्नागिरी
- ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी ज्यांच्या कुटुंबाची आज अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी साळवी यांच्या पत्नी, दोन मुलगे, मोठा भाऊ आणि वहिनी देखील उपस्थित असणार आहे.
चंद्रपूर
- गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे आज पोंभुरणा तालुक्यात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे.
बुलढाणा
- पुलवामा हल्ल्या संदर्भात मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी जिल्ह्यात काँग्रेसकडून विविध ठिकाणी मोदी सरकार विरुद्ध आंदोलन पुकारण्यात आले आहे.
गोंदिया
- गोंदिया काँग्रेस कमिटीच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. विविध प्रश्नांवर या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येणार आहे.