मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
 
एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात धाव


 शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे कॅम्पला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी यांच्या नियुक्तीलाही याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. तसेच, शिंदे कॅम्पच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.  यावर आज सुनावणी होणार आहे.  न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. तर, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी उद्धव ठाकरेंची बाजू मांडतील. ॲडव्होकेट रवीशंकर जंध्याल उपाध्यक्षांची बाजू मांडणार आहेत.


 आज संध्याकाळपर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता


आज संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 16 आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, या आमदारांनी त्यांची बाजू न मांडल्यास त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. शिवसेनेनं या बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालावर ही पुढची कारवाई अवलंबून असेल. 
 
एकनाथ शिंदेंचं संजय राऊतांना ट्विटद्वारे उत्तर


हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू. मुंबई बाम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलंय. राऊतांनी या आमदारांबाबत काल केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंनी ट्विटनं राऊतांना टॅग करुन उत्तर दिलंय. 


 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात हाय अलर्ट जारी


 मुंबई आणि एमएमआरडीए भागात विशेष सूचना देण्याचे गृहखात्यानं आदेश दिलेत. राज्यातील राजकीय पेचप्रसंगामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृह खात्यानं सूचना दिल्या आहेत. बंडखोर आमदारांबाबत आणखी नाराजी वाढण्याची शक्यता लक्षात घेत गृह खात्याकडून आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, राज्यपालांनी डीजीपींना लिहिलेल्या पत्रावर आज पोलिसांकडून उत्तर दिलं जाणार आहे. 


राज्यातील बंडाचे परिणाम मनपा निवडणुकीवरही होणार


निवडणुकीच्या राजकारणावर ही परिणाम जाणवणार आहेत. गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेची मनपावर आलेली सत्ता पुन्हा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गेली चाळीस वर्ष सेनेचे नेते सुरेश जैन यांच्या गटाची जळगाव मनपा वर सत्ता होती. मात्र गिरीश महाजन पालकमंत्री असताना त्यांनी मनपावर भाजपची एक हाती सत्ता आणली होती. मात्र राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपाचे 30 नगरसेवक सेनेला जाऊन मिळाल्याने, भाजपाची सत्ता जाऊन पुन्हा सेनेची एकहाती सत्ता आली आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपासोबत सरकार आले तर, या भीतीने सेनेच्या गटात भीतीचे वातावरण आहे. 
 
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनं, सभा, बैठका 
 
 उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी समर्थन रॅली काढण्यात येणार आहे. बुलढाणा,  अमरावती, शिर्डी, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
 आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा अर्ज दाखल करणार


 विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दुपारी 12.15  वाजता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या उपस्थितीत यशवंत सिन्हांची पत्रकार परिषद होणार आहे.


 देशभरात विविध ठिकाणी अग्नीपत योजनेविरोधात काँग्रेसकडून आंदोलन
 
 देशभरात विविध ठिकाणी अग्नीपत योजनेला विरोध म्हणून काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.