Aurangabad News: शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन केले आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यातच ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि आता शिंदे गटात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार संदिपान भुमरे यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महिला आमदारांना वेश्या म्हंटलं असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


बंडखोरीनंतर भुमरे हे मंगळवारी पहिल्यांदाच जिल्ह्यात परतले. यावेळी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्या तोंडातून असे शब्द निघणे म्हणजे चांगलं नाही. त्यांनी फक्त माझ्या एकट्यावर टीका केली नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांवर टीका केली. राऊत हे आम्हाला रेडे म्हणाले, कुत्रे म्हणाले, यांचे मृतदेह येतील असेही म्हणाले. एवढच नाही तर महिला आमदारांना वेश्या असल्याचं राऊत म्हणाले असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. 


पक्षासाठी लाठ्या खाल्ल्या...


कॅबिनेट मंत्रीपद दिले असताना सुद्धा नाराजी का? या प्रश्नाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, पक्षाने मला मोठ केले हे ठीक आहे. पण मी सुद्धा पक्षासाठी खूप काही केलं आहे. आम्ही काही थेट आमदार झालो नाही. पक्षवाढीसाठी सर्वांनीच काम केले आहे. गेली 35 वर्षे पक्षासाठी मी काम केले असून, त्यासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कुणीही काहीही शिकवाची गरज नाही असेही भुमरे म्हणाले.


समर्थकांकडून जल्लोष...


भुमरे यांचं औरंगाबादच्या विमानतळावर आगमन होताच समर्थकांनी जंगी स्वागत केले. भुमरे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होते. तर कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. तसेच भुमरे जिथे जाणार आम्ही सुद्धा त्यांच्यासोबतच असणार असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.