Kolhapur Rain : सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांच्या वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं प्रशासनानं तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  


 


सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांच्या वर पोहोचली आहे. ही पाणी पातळी जर 39 फुटांवर पोहोचली तर इशारा पातळी समजली जाते. तर नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेली तर ती धोका पातळी म्हणून ओळखली जाते. त्यामुळं प्रशासनानं नदीकाठच्या गांवा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पाणी पातळी सध्या झपाट्यानं वाढत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी धोकादायक स्थितीकडे जात आहे. ज्या ठिकाणी पाणी पातळीत वाढ होत आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांनी तातडीनं स्थलांतर करावं असं प्रशासनानं सांगितलं आहे. कारण पाणी शिरल्यानंतर नागरिकांना बाहेर काढणं खूप कठीण जात, त्यामुळं आत्ताच स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर  NDRF च्या दोन टीम देखील कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. एक टीम कोल्हापूर शहर तर दुसरी टीम शिरोळ तालुक्यामध्ये तैनात केली आहे. राधानगरी धरणाच्या कृत्रिम दरवाजातून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात  सोडला आहे.




 
जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर  वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसानं हजेरी लावली आहे.  हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


महत्वाच्या बातम्या: