Aurangabad News: विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या यादीतून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत पंकजा यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर औरंगाबाद येथील भाजप कार्यालय आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आता या सर्व घडामोडीवर मनसे नेते तथा पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खुद्द भाजपमधूनच पंकजा मुंडेंचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच महाजन यांनी म्हंटले आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना महाजन म्हणाले की, पंकजा मुंडे कराडांच्या कार्यालयावर हल्ला करेलच कशी, त्यामुळे मी एका पक्षाचा प्रवक्ता असलो तरीही मामा म्हणून मला पंकजा मुंडे यांच्या बदनामीचे कट कारस्थान वाटत आहे. तर पंकजाचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा पक्षातूनच प्रयत्न केला जात असल्याचं महाजन म्हणाले. आणि हे कोण करतोय हे सर्वांना माहिती आहे. स्त्री म्हणून पंकजावर बंधने आहे, म्हणून सर्व उघड करता येत नाही असेही महाजन म्हणाले.
जनसामान्यात स्थान कमी करण्याचे प्रयत्न
पुढे बोलताना महाजन म्हणाले, पंकजा मुंडे यांनी विधान परीषदेच्या तिकिटाची कधीच मागणी केली नाही. पंकजा स्वाभिमानी स्त्री आहे. पंकजाचे राजकीय पुनर्जीवन करण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असू शकते. बोलणारे हेच नाकारणारे हेच मग यावर पंकजाने स्पष्टीकरण का द्यायचे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. पंकजाची बदनामी करण्याची, जनसामान्यात स्थान कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे महाजन म्हणाले.
भाजपला काहीच फायदा होणार नाही...
पंकजाचे समर्थक पंकजाशी बांधील, पक्षाशी नाही. मात्र या प्रकरणामुळे पंकजा अस्वस्थ, कुटुंब अस्वस्थ आहे. एखाद्या स्त्रीचा पराभव करण्यासाठी, जेरबंद करण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी हे चक्रव्युव्ह करत असेल तर कालांतराने पडद्याआडचा तो व्यक्ती बाहेर येईल. पंकजा भोवतीचे बदनामीचे चक्रव्यूह पक्षांतर्गतच सुरु असल्याच महाजन म्हणाले. पंकजा मुंडेंचं नेतृत्व पाहता, लाखोंचा मेळावा भरवणाऱ्या पंकजा दोन चार कार्यकर्ते कशाला पाठवेल. भाजप कार्यालयवर जाणाऱ्या या कार्यकर्त्यांना कोण पक्ष प्रवेश देणार होता?, यातून केवळ काही काळ पंकजाला त्रास देऊ शकतात बाकी नाही. पंकजाची प्रतिमा कशी मलिन होईल याचा जाणून बुजून प्रयत्न केला जात आहे. मात्र भाजपला याचा काही फायदा होणार नाही, असेही प्रकाश महाजन म्हणाले.