Trupti Desai In Pune:  वटपोर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. माझं सगळ्या महिलांना आवाहन आहे की ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पुजा करावी वाटते. त्या महिलांनी आवर्जून ही पुजा करावी. यात कोणीही भेदभाव करु नये, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या (bhumata Bhriget) तृप्ती देसाई (Trupti  Desai) यांनी केलं आहे.


वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालन पोषण करण्याचा वटपौर्णिमेदिवशी संकल्प करावा. जेणेकरुन पर्यावरणाचं देखील आपल्याकडून संवर्धन होईल, त्यामुळे वटपोर्णिमेला झाडाची पुजा करण्यापेक्षा झाड लावण्याचा सल्ला तृप्ती देसाईंनी दिला आहे.


जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे आणि म्हणूनच सत्यवानाच्या  सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणूनच मुली शिकत आहेत, प्रगती करत आहेत, महिला उच्चपदी काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या.


भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येतात. त्यांनी वटपोर्णिमा व्रतावरुन आता नवं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आतापर्यंत महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे.  त्यांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं काम त्या कायम करत असतात. यापुर्वी त्यांनी अभिनेत्री  केतकी चितळेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता.


तृप्ती देसाईंच्या अगदी उलट मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केलं आहे. त्या म्हणतात की, वडाची पुजा करणारी सत्यवानाची सावित्री जशी आम्हाला समजली मात्र स्वत:च्या अंगावर शेणाचे शिंतोडे उडवून घेणारी जोतिबाची सावित्री मात्र आम्हाला समजली नाही हिच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. जोतिबांच्या सावित्रीचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. मात्र या संघर्षाला सावित्रीबाई सामोरे गेल्या म्हणून मी आज माझं मत मांडू शकत आहे. त्यासोबतच त्यांनी महिलांना वृक्षारोपणाचा देखील सल्ला दिला.