Aurangabad News: गावात गेल्या चार दिवसांपासून वीज (Electricity) नसल्याने पाणीपुरवठा (Water Supply) योजना बंद पडल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) एका तरुण नवनिर्वाचित सरपंचाने (Sarpanch) महावितरण कार्यालयात अनोखं आंदोलन केले आहे. थेट महावितरण कार्यालयात जाऊन अर्धनग्न होऊन या नवनिर्वाचित सरपंचाने  हटके आंदोलन केले. तसेच आपल्या गावातील व्यथा मांडत खंडीत झालेली वीज पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. मंगेश साबळे असे या नवनिर्वाचित सरपंचाचे नाव असून, औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई (पायागा) या गावाचा हा तरुण सरपंच आहे. 


गेवराई (पायागा) गावाला पाणीपुरवठा करणारा विद्युत रोहित्र चार दिवसांपूर्वी जळाला होता. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडली आहे. तर गावातील नळांना चार दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने गावकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे पाण्याचे जार किंवा बाजूच्या गावातून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. दरम्यान याचवेळी या गावाचा नवनिर्वाचित सरपंच मंगेश साबळे याने महावितरण कार्यलयात जाऊन,  रोहित्र बदलून देण्याची मागणी केली. मात्र महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून आधी थकबाकी भरण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप मंगेश साबळे याने केला आहे. तर वीज बिल भरण्याचं सांगितल्यास आम्हाला अधिकारच नसल्याचे कारणे देऊन जाणीवपूर्वक वीज जोडणी केली जात नसल्याचा आरोप मंगेश याने केला आहे. 


वनिर्वाचित सरपंच झाला 'अर्धनग्न'
 
गावाचा विकास करेल या अपेक्षेने गेवराईच्या गावकऱ्यांनी सरपंचपदी निवडून दिले. मात्र महिना उलटत नाही तो गावातील पाणीपुरवठा योजनेचं रोहित्र जळाले. त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनंती करूनही रोहित्रे बसवले जात नाही. त्यामुळे अखेर मंगेशने अनोखं आंदोलन केले. थेट महावितरण कार्यालय गाठत या नवनिर्वाचित सरपंच मंगेशने अर्धनग्न होऊन तिथेच आंदोलन सुरु केले. गावातील नागरिकांना मी पाणी देखील पाजू शकत नसेल तर माझे पद काय कामाचे म्हणत मंगेशकडून हे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच आजच्या आज रोहित्र बसवण्यात आले नाही तर, महावितरण कार्यालयात स्वतःला खड्यात गाडून घेण्याचा इशारा मंगेशने दिला आहे. 


गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल... 


यावर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरीत अजूनही पाणी आहे. मात्र असे असतांना पाणीपुरवठा योजनेचं रोहित्र जळाल्याने गेवराई (पायागा)  गावातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. म्हणून गावातील नळांना पाणीच आले नाही. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना बाजूच्या गावात जावे लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. तर महावितरण कार्यालयाने लवकरात लवकर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा गावकरी आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.