Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात बिबट्याचे (Leopard) हल्ले सुरूच आहे. मात्र दुसरीकडे आजारी अवस्थेत असलेल्या बिबट्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंढेगाव शिवारात (Mundhegoan) बिबट हल्ल्याची घटना घडली होती. मात्र आज तळेगाव परिसरात नागरिकांच्या गर्तेतून बिबट्या वाट काढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या या बिबट्यावर नाशिकच्या रोपवाटिकेत उपचार सुरु आहेत. 


नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri), निफाड, येवला आदी परिसरात बिबट्याचे नित्याचे झाले आहे. त्याचबरोबर हल्लेही सुरु आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीनंतर पिंजरे लावण्यात येऊन बिबट्याना जेरबंद केले जात आहे. मात्र या सगळ्यात बिबट्याचे दुखणे कुणी समजून घेताना दिसत नसल्याचे परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील तळेगाव हद्दीमध्ये एका रस्त्यालगत बिबट्या आढळून आला. मोकळ्या रस्त्यावर बिबट्या चालत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. एवढ्या शांत आणि निश्चल अवस्थेत बिबट्या चालत असल्याचे पाहून हा बिबट्या आजारी असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. बिबट्या धापा टाकत होता, पोटही खपाटीला गेल्याचे दिसून येत होते. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. 


इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवळ फिरायला गेलेल्या नागरिकांना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या मुक्त संचार करतांना दिसला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नागरिक भयभीत झाले होते. सदर बिबट्याला सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला. तात्काळ वन विभागाला ही माहिती कळवण्यात आली. बिबट्या हा तळेगाव डॅम परिसरातील भक्ष करण्यासाठी कुत्रे, पाळीव प्राणी खायला येत असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. मात्र नागरिक जवळ जात असतानाही बिबट्या मात्र शांततेत व काहीच ऊर्जा नसल्याच्या स्थितीत चालत असल्याने बिबट्या आजारी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्याला जास्त वेळ डोळेही उघडे ठेवता येत नव्हते. अशावेळी नागरिकांनी या बिबट्याचे फोटो, व्हिडीओ काढले. 


दरम्यान उशिराने वनविभागाला घटनेची माहिती मिळाली. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी बिबट्याची अवहेलना करण्यास सुरवात केली होती. अनेकजणांनी व्हिडिओ फोटो, कल्ला केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यांनतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याच्या हालचालीवरून बिबट्या आजारी आणि उपाशीपोटी असल्याचे वनाधिकाऱ्यांना जाणवले. वनाधिकाऱ्यांनी शिताफीने त्याला पकडून पिंजऱ्यामध्ये घातले. परिस्थिती गंभीर असल्यामुळे तातडीने बिबट्याला नाशिक येथील बिबट उपचार व निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यावर उपचार सुरु असून बिबट्याची अवस्था नेमकी कशामुळे झाली, हे निदान झाल्यानंतर समोर येणार आहे.