Aurangabad Crime News: घरात कोणी नसताना अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम भावाला जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 46 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यातील रकमेपैकी 25 हजार रुपये पीडितेचे उपचार आणि पुनर्वसनासाठी देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात अल्पवयीन पीडितेने पोलिसात फिर्याद दिली होती की, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या 33 वर्षीय भावासह आई-वडिलांबरोबर राहत होती. दरम्यान 2020 मध्ये पीडितेचा भाऊ हा सुरुवातीला पीडितेकडे वाईट नजरेने पाहायचा. पुढे वाईट उद्देशाने पीडितेला स्पर्श करायला लागला. त्यानंतर डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान आरोपी सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असताना दुपारी घरी आला. त्यावेळी आई-वडील घरात नसल्याने अल्पवयीन पीडित मुलगी एकटीच घरात होती. तर घरात कोणीच नसल्याची संधी साधत नराधम भावाने आपल्याच बहिणीवर अत्याचार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तिला धमकी देत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
अशी आली घटना समोर...
अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्यानंतर नराधम भावाची पुन्हा नियत खराब झाली. पहिल्यांदा अत्याचार केल्यावर पुढे आरोपीने पीडितेवर आणखी दोन-तीन वेळा अत्याचार केला. याच काळात पीडितेचे पोट दुखत असल्याने तिला आई-वडिलांनी एका खासगी रुग्णालयात नेले. यावेळी तिला रुग्णालयात दाखल करताना आरोपीने पीडितेचे वय व नाव चुकीचे नोंदवले. त्याच दिवशी पीडितेने मुलाला जन्म दिला. त्यामुळे बाळाची नोंद करण्यासाठी डॉक्टरांनी पीडितेचे आधार कार्ड मागितले. त्यावेळी दिलेल्या आधारकार्डवरील नाव, पत्ता आणि आधी सांगितलेला नाव पत्ता याच्यात तफावत आढळून आल्याने डॉक्टरांनी सिटी चौक पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली...
या प्रकरणात तत्कालीन फौजदार वंदना मुळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी लोक अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात डॉक्टरांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ज्यात आरोपी भावाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 46 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली गेली आहे.
मुलीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न...
आपल्याच भावाने दोन-तीन वेळ अत्याचार केल्याने पीडित मुलीला मोठा धक्का बसला होता. त्यातच ती गर्भवती राहिल्याने तिला याचा मानसिक धक्का बसला. त्यामुळे मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरोपीने आणि मुलीच्या आई-वडिलांनी बाळाचे संगोपन करण्याचं तिला आश्वासन दिल्याने तिने आपला निर्णय बदलला.