Sandipan Bhumre On Sushma Andhare: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा घेत भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केल्याचं अंधारे म्हणाल्यात. तर अंधारे यांनी केलेल्या याच आरोपाला भुमरे यांनी उत्तर दिले आहे. रात्रीच्या सुमारास आलेल्या आणि अर्ध्यातासाच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांना पैठणचा विकास कसा दिसणार असं भुमरे म्हणाले आहे.
यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, सुषमा अंधारे या पैठण तालुक्यात संध्याकाळी आल्या असल्याने त्यांना काय विकास दिसणार आहे. त्यांचा आणि पैठणचा काय संबध आहे. त्या आल्या कधी, थांबल्या किती दिवस आणि त्यांनी पैठणचा विकास कसा पहिला एवढ्या वेळेत, त्यामुळे आम्ही पैठणमध्ये मुतारी बांधल्या की नाही बांधल्या हे त्यांना कसे कळणार आहे. हेच आरोप स्थनिक माणसाने केले असते तर समजू शकलो असतो. पण अर्ध्या तासासाठी बाहेरचा माणूस येतो आणि त्याने आम्हाला विकासाच्या गप्पा सांगायच्या हे पटत नाही, असे भुमरे म्हणाले.
फक्त सभा घेतल्याने परिवर्तन होत नाही...
तर सुषमा अंधारे पुढील तीन दिवस औरंगाबादमध्ये महाप्रबोधन यात्रा घेणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, या तीन दिवसांनी काय होणार आहे. त्यामुळे त्यांना म्हणावे की, तुम्हाला जेवढ्या सभा घ्यायच्या आहेत तेवढ्या सभा घाव्यात. तर फक्त सभा घेतल्याने परिवर्तन होत नाही. त्यासाठी काम करावे लागते आणि 24 तास लोकांमध्ये राहावे लागते. आम्ही अजूनपर्यंत लोकांमध्ये आहोत. त्यामुळेच एवढ्या वर्षांपासून आम्ही जिंकत आलो आहे. तर सुषमा अंधारे आल्या काय आणि आणखी कोणी आले काय याने आम्हाला काहीच फरक पडत नसल्याचे भुमरे म्हणाले.
दानवेंनाही उत्तर...
काही पोलीस भुमरे यांची चापलूसी करत असून ते भुमरे यांचा पगार घेतात की सरकारच्या घेतात असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठणच्या सभेत केला होता. त्यांच्या याच आरोपाला देखील भुमरे यांनी उत्तर दिले आहे. दानवे असे कशामुळे म्हणाले हे मला माहित नाही. मात्र पोलीस पगार शासनाचाच घेतात. त्यामुळे दानवे यांना काय बोलायचे होते ते त्यांनी उघडपणे बोलायला हवे होते. तसेच दानवे विरोधी पक्षनेते असून, त्यांना बोलण्यासाठीच त्या पदावर पाठवले असल्याचं देखील भुमरे म्हणाले.