Aurangabad News: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गटाच्या आमदारांना वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सत्तांतरानंतर आजतागायत ही सुरक्षा कायम आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या देखील मोठी असून, या आमदारांच्या दिमतीला दीडशे पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. जिल्ह्यात 550 नागरिकांमागे एक पोलीस अन् एक आमदारामागे 30 पोलीस असल्याचे सद्याचे चित्र आहे. यामुळे यंत्रणेवर असाह्य ताण होत असून वाहतूक गस्त आणि तपासही ढासळला आहे. 


सत्तांतराच्या शंभर दिवसानंतर देखील शिंदे गटातील आमदारांना खरोखरच धोका आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे जवळपास 19  लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरातील वाहतूक व्यवस्था संभाळण्यासाठी केवळ 200 पोलीस आहेत. तर दुसरीकडे दोन मंत्री आणि तीन आमदारांचं घर कार्यालय आणि त्यांच्या भोवतीची सुरक्षेसाठी तब्बल दीडशे पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे. ज्याप्रमाणे औरंगाबादमध्ये असे चित्र पाहायला मिळतं आहे, तसंच संपूर्ण महाराष्ट्रात देखील असेच चित्र असल्याची टीका अजित पवारांनी केला आहे. 


राज्यात मुख्यमंत्री आणि आठ मंत्री वगळता 31  आमदारांना विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. वाय दर्जा आणि सोबत एस्कॉर्ट अशी दोन शिफ्टमध्ये या आमदारांना सुरक्षा पुरवले जाते. त्यामुळे मंत्रिपद नाही मिळालं म्हणून काय झालं, या वाय दर्जाच्या सेक्युरिटीमुळे आणि सोबत असलेल्या एस्कॉर्टमुळे राज्यमंत्र्यांचा फील येतोय अशी चर्चा आमदारांमध्ये पाहायला मिळत आहे. 


कोणासोबत किती बंदोबस्त... 



  • रोहयो मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या सुरक्षेसाठी सोबतीला एस्कॉर्ट, एक पोलीस उपनिरीक्षक, सहा पोलीस अंमलदार, यांच्यासह दोन उपनिरीक्षक आणि दहा पोलीस अंमलदारांसह एकूण तीन वाहने तैनात असतात. सोबतच त्यांच्या औरंगाबाद येथील घरी दिवसा एक उपनिरीक्षक, चार पोलीस कर्मचारी आणि रात्री चार कर्मचारी बंदोबस्तासाठी असतात.  त्याचप्रमाणे सूतगिरणी येथील त्यांच्या कार्यालयात दिवसाला एक उपनिरीक्षक, पाच कर्मचारी आणि रात्री असाच बंदोबस्त असतो. 


 



  • कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादमधील बेगमपुरा भागातील घरी एक पॉईंट बंदोबस्त आहे. एक अधिकारी आणि चार ते पाच कर्मचारी बंदोबस्तसाठी येथे असतात. तसेच सिल्लोडमधील घराला एक अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिवसा आणि रात्रीही असतो. तसेच सत्तार यांच्यासोबत एस्कॉर्ट, एक उपनिरीक्षक, सहा कर्मचारी आणि अतिरिक्त बंदोबस्त म्हणून दोन उपनिरीक्षक आणि दहा कर्मचारी तीन वाहनांसह तैनात असतात. 


 



  • आमदार संजय शिरसाट यांच्या सोबतीला एस्कॉर्ट, एक उपनिरीक्षक, सहा पोलीस अंमलदार, अतिरिक्त बंदोबस्त, दोन उपनिरीक्षक आणि दहा पोलीस अमलदार तीन वाहनांसह तैनात असतात. तसेच त्यांच्या घरी दिवसा एक उपनिरीक्षक, चार सशस्त्र पोलीस कर्मचारी असतात. सोबतच त्यांच्या अहिल्यादेवी होळकर येथील कार्यालयात दिवसाला तीन कर्मचारी आणि रात्री दोन कर्मचारी असा बंदोबस्त असतो. 


 



  • आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासोबत एक एस्कॉर्ट, एक उपनिरीक्षक, सहा पोलीस अंमलदार यांच्यासह अतिरिक्त बंदोबस्त म्हणून दोन पोलीस उपनिरीक्षक आणि 10 अंमलदार असतात. तर यांच्याकडेही एकूण पोलिसांची तीन वाहन तैनात आहे. सोबतच निराला बाजार येथील त्यांच्या घरी एक उपनिरीक्षक, चार सशस्त्र पोलीस असतात. शिवाय त्यांच्या कार्यालयात दिवसा तीन कर्मचारी आणि रात्री दोन कर्मचारी असा बंदोबस्त असतो. 


 



  • आमदार रमेश बोरणारे यांच्यासोबत एस्कॉर्ट, एक पोलीस उपनिरीक्षक, सहा पोलीस कर्मचारी आणि मुख्यालयातून एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त असतो.