Rahul Gandhi : भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नसल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना मराठीतून बोलण्याचा आग्रह केला. सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिलं नाही. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. तसेच आमची यात्रा रोखून दाखवा, असे म्हणत त्यांनी आव्हान दिलं. जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
देशात दोन मोठ्या समस्या
भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, असेही राहुल गांधी म्हणाले. सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. त्यांचे कर्ज माफ होत नाही, संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नसल्याचे गांधी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
पैशांचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न
पैशांचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात आहेत. सध्या सर्वाचं पोट भरणारा शेतकरी संकटात आहे. देशात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असल्याचे गांधी म्हणाले. विदर्भातील शेतकरी समस्येत असताना आमच्या सरकारनं त्यांना मदत केल्याचे राहुल गांधी म्हणाले. ही यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारच असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
सत्ताधारी पक्षाकडून न्याय व्यवस्थेवर दबाब
सत्ताधारी पक्षाकडून न्याय व्यवस्थेवर दबाब आणला जात आहे. देशात वेगवेगळ्या समस्या आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी भारत जोडो यात्रेशिवाय पर्याय नसल्याचे गांधी म्हणाले. सध्या देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. तरुणांना सध्या नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नसल्याचे गांधी म्हणाले. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे, तसेच आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याचे गांधी यावेळी म्हणाले. सरकारी शाळा, सरकारी दवाखाने नाहीत असे गांधी म्हणाले.
सावरकरांच्या माफीनाम्याचे राहुल गांधींनी केलं वाचन
यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचे वाचन केले. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ते पत्रही दाखवले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हा माफीमाना वाचावा असे गांधी म्हणाले. माझ्या वक्तव्यावरुन जर कोण यात्रा रोखणार असेल, तर त्यांनी रोखावी यात्रा असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं. सरकारला जर वाटलं ही भारत जोडो यात्रा रोखली पाहिजे, तर त्यांनी यात्रा रोखावी असेही गांधी म्हणाले. आम्हाला भारत जोडायचा आहे. आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली आहे. आता आम्हाला श्रीनगरपर्यंत जायचे असल्याचं गांधी म्हणाले.