Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात नशेचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. अशातच आता हे प्रमाण एवढा वाढला आहे की, चक्क किराणा दुकानाच्या बाहेर अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसात याबाबत तक्रार करून देखील काहीच होत नसल्याने अखेर याबाबत एका तरुणाने स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार समोर आणला आहे. औरंगाबादच्या नारेगाव भागात अशाचप्रकारे दारू विक्री करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे दारू विक्रीसाठी चक्क अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागातील नारेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांकडून कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने या भागात होत असलेल्या अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन केले. याचा व्हिडिओ देखील समोर आला असून, नारेगाव भागात चक्क किराणा दुकानाच्या बाहेर दारू विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलीस कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद शहर नशेच्या विळख्यात...
औरंगाबाद शहरात नशेचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून अनेकदा छोट्या-मोठ्या कारवाया देखील केल्या जातात, मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नशेसाठी इतर राज्यातून नशेच्या गोळ्या येत असल्याचे देखील पोलीस तपासातून यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. शहरातील तरुण या नशेच्या विळख्यात सापडला असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अशात पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्याची अपेक्षा सर्वसामान्य व्यक्ती करत आहे.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार...
औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागातील नारेगाव परिसरात दारू विक्री वाढली असल्याची तक्रार 13 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात अमोल पट्टेकर नावाच्या तरुणाने केली होती. शाळेच्या परिसरात आणि इतर दुकानात अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र पोलिसांकडून कोणतेही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी तरी याची दखल घेतील का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयातून थेट कायमचं संपवलं; औरंगाबादेत अंधश्रद्धेचा बळी