Aurangabad Crime News: औरंगाबादच्या मिटमिटा परिसरात काल सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यात देखील पोलिसांना यश आले आहे. जादूटोण्याच्या संशयातून दारू पाजून डोक्यात फावड्याचा दांड्याने मारहाण करून हत्या केल्याचं आरोपीने कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारभारी सिध्दु शेंबडे, ( वय 42 रा. घोन्शी, ता. घणसावंगी, जि. जालना) असे मयत व्यक्तीचे नाव असून,सद्दाम सैय्यद शीराज सैय्यद, (वय 24 वर्षे, ह.मु. शिक्षक कॉलनी, रांजणगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.


बुधवारी मिटमिटा परिसरातील रेल्वे पटरीच्या बाजूला एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी मयत व्यक्तीच्या डोक्यात जबर मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होते. त्यामुळे याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत असतानाच सदर गुन्हयातील संशयीत आरोपी वाळूज भागातील रांजणगाव- कमळापुर येथली असून, त्याचे फर्निचरचे दुकान असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कारभारी शेंबडे हा आरोपी सद्दामची सासुरवाडी असलेल्या  घोन्शी गावचा असल्याने त्यांची ओळख होती. दरम्यान कारभारी हा जादूटोणा करायचा आणि त्याने केलेल्या जादूटोण्यामुळेचं आपल्या व्यवसायात नुकसान झाल्याचा सद्दामला संशय होता. त्यामुळे त्याचा कारभारी याच्यावर राग होता आणि याच रागातून त्याने खून केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. पोलिसांनी आरोपी सद्दामला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा दाखल करण्यात आला आहे.


असा रचला खुनाचा प्लॅन...


कारभारी याने काहीतरी जादूटोणा केल्याने आपल्या व्यवसायात नुकसान झाल्याचा सद्दामला संशय होता. त्यामुळे त्यानं कारभारीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने 25 ऑक्टोबरला कारभारीला फोन करून एका महिलेस मुलंबाळ होत नसून, तिला जडीबुटी देण्याचे कारण सांगुण रांजणगाव- कमळापुर येथे बोलावून घेतले. त्यामुळे कारभारी त्याचा भाचा सुनिल व सुनिलचा मावस भाऊ दिनेश पवार असे कारने कमळापुर फाटा येथे येऊन सद्दामला भेटले. त्यानंतर सद्दामने सुनिल व सुनिलचा मावस भावास तुम्ही जा कारभारी (मयत) हा चार-पाच दिवसांनी येईल असे सांगितले. 


त्यांनतर सद्दाम व कारभारी यांनी दारु पिली. सद्दामने कमळापुर येथील एका हार्डवेअरच्या दुकानावरुन फावड्याचा दांडा विकत घेवुन ते दोघे मोटारसायकलने मिटमिटा शिवार येथील रेल्वे पटरी जवळ गेले. तेथे गेल्यावर आरोपी सद्दाम याने कारभारी यास फावड्याचा दांड्याने मारहाण करून कायमचं संपवलं. कारभारीचा जीव गेल्याची खात्री झाल्यावर सद्दामने तेथून पळ काढला.