Aurangabad Farmers Protest: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते असल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी महिला शेतकरी देखील धरणाच्या पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळाले. 


गंगापूर तालुक्यातील अंमळणेर येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी धरण सुरु झाल्यापासुन जेव्हा जेव्हा धरण 70  ते 75 टक्के भरतो, त्यावेळी धरणाचे पाणी हे संपादीत जमिनीच्या व्यतिरीक्त इतर जमिनींमध्ये शिरते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते. यामुळे खरिपाबरोबर रब्बीचे देखील नुकसान होते. तर याबाबत वारंवार जायकवाडी विभागाला पत्र व्यवहार करुन देखील त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. तसेच कोणतेही नुकसानभरपाई देखील दिलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे.


शेतकऱ्यांची न्यायालयात धाव...


यापूर्वी संबधित शेतकऱ्यांनी गंगापुर तहसिल कार्यालय व जायकवाडी विभागाला लेखी तक्रार केली. मात्र कोणतेही दखल घेण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावेळी जायकवाडी, पाटबंधारे विभागाविरुध्द रिट याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान अपीलामध्ये संपुर्ण सुनावणी नंतर अपीलाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागला. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडी विभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. पाटबंधारे विभाग जानुनबुजुन हा विषय प्रलंबित ठेवत असुन एकप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात येत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. 


शेतकरी उतरले पाण्यात...


यावर्षी अतिवृष्टी झाल्याने जायकवाडी धरण 100 टक्के भरला होता. त्यामुळे जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतात देखील पाणी घुसले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी अनकेदा शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या, पण तरीही त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. यावेळी शेतकरी पाण्यात उतरले होते. सोबतच महिला शेतकरी देखील यावेळी उपस्थित होत्या. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली. 


औरंगाबाद पुन्हा हादरल! भाजी विक्रेत्या वृद्ध महिलेची हत्या, घटनास्थळी पोलीस दाखल