Aurangabad Crime News: दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर बसलेल्या दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरलं आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील भाजीपाला विक्री करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा तिच्या राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. घटनास्थळी बिडकीन पोलीस दाखल झाले असून, पंचनामा करण्यात येत आहे. जानकी हरीदास महालकर (वय 70 वर्षे, रा. बिडकीन गावठाण, औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिडकीन गावठाण परिसरात राहणाऱ्या जानकी महालकर या गावातील मंडीत भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करायच्या. पतीचे निधन झाल्याने गेल्या काही वर्षांपासून त्या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आज सकाळी राहत्या घरातील मागच्या  खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनाम केला असून, श्वान पथकासह ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात येणार आहे.  


अनेकांकडे उधारीचे पैसे... 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जानकी महालकर या कुणाला पैश्याची गरज असल्यास मदतीला धावून जायच्या. तर गावातील अनेकांकडे त्यांची उधारी बाकी होती. त्यामुळे या आर्थिक व्यवहारातून तर ही हत्या झाली नाही ना या दृष्टीने पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे. 


घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी... 


बिडकीन येथील वृद्ध महिलेच्या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी श्वान पथकासह ठसेतज्ज्ञ यांनी देखील पाहणी केली आहे. तर औरंगाबादचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली आहे. तर घडलेल्या घटनेची त्यांनी माहिती घेतली आहे. सोबतच स्थानिक पोलिसांना तपासाबाबत सूचना देखील कलवानीया यांनी दिल्या आहे. त्यामुळे आरोपीला शोधण्यासाठी बिडकीन पोलिसांकडून पथक सुद्धा नियुक्त करण्यात आले आहे. 


तीन दिवसांत तीन खून...


औरंगाबाद जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या काळात शहरात तीन खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी औरंगाबादच्या घाटी परिसरात दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तो आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिल्ह्यात आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकामागून एक होणाऱ्या खुनाच्या घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.