Interview with Bhupendra Yadav: भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या तयारी आत्तापासूनच सुरु केली असून, पक्षानं लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मिशन 45 हाती घेतलं आहे. तर या पार्श्वभूमीवर केंद्रीय श्रम, रोजगार,वन मंत्री भूपेंद्र यादव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात ते ( १८ व १९ सप्टेंबर) खामगाव व जळगाव विधानसभा मतदारसंघात आढावा घेत आहे. यावेळी त्यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तर याचवेळी भूपेंद्र यादव यांनी भाजप-मनसे युतीचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार घेतील असा खुलासाही केला आहे.
रिपोर्टर: लोकसभेसाठी मिशन 45 काय आहे? ते 48 का नाही, कुठल्या तीन जागा आहेत ज्या आपण विरोधकांना सोडतायात. तसेच आपण असंही म्हटलं आहे की, आम्ही बारामती जिंकू...
भूपेंद्र यादव: भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये राहणारी पार्टी आहे. बूथपर्यंत पार्टीला मजबूत करण्यासाठीच हे मिशन आहे. तर पक्षाचे जे काम आहे ते आम्ही करतोय, तसेच निवडणूक जिंकण्यासाठीच लढली जाते आणि तेच बारामतीला का शक्य नाही...
रिपोर्टर: एकनाथ शिंदे आपल्याकडे आले, परंतु आपण शिवसेनेकडे ज्या गतनिवडणुकीमध्ये जागा होत्या त्या मतदारसंघात देखील भाजपा मजबूत करण्याचं काम करत आहात. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होत नाही का?
भूपेंद्र यादव: असा विचार करणं चुकीचे आहे. आमची पार्टी युतीचे पूर्णपणे पालन करते. आतापर्यंतचा इतिहास पहा, भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत असलेल्या लोकांना घेऊन पुढे गेली आहे. पूर्वी शिवसेना वेगळी लढली होती. मात्र निवडणुकीनंतर आम्हीसोबत घेण्याचं काम केलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या. तरी आम्ही आमच्यासोबत असलेल्या पक्षाला एकत्र घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिवसेना आमच्या सोबत आहे. आम्ही युती धर्माचं पालन करू. तसेच आमचं संघटन मजबूत झालं तर आम्ही आमच्यासोबत असलेल्या पक्षाला मजबूत करू. त्यामुळे आमची पार्टी स्वतःला मजबूत करते आणि युतीचही पालन करते.
रिपोर्टर: महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात धनुष्यबाण ही चिन्ह कोणाला मिळेल हे आत्ता तरी सांगता येत नाही. पण शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे का? ते आपल्याला आवडेल का? आणि त्यांनी तसं करावं का?...
भूपेंद्र यादव: जो विषय न्यायप्रविष्ठ आहे त्यावर मी बोलणार नाही. आपल्याकडे निष्पक न्यायची प्रणाली आहे. आपला प्रश्न अपेक्षा आकांक्षावर अवलंबून आहे. त्याचा मी उत्तर देणार नाही. मी तथ्यावर बोलतो माझं उत्तर तथ्य आहे. आमच्यासोबत एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं काम करत आहेत. त्यामुळे आमचं एकच लक्ष आहे ते जनतेने ज्या विश्वासाने मागच्या वेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मतदान केलं होतं, महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान केलं, मात्र त्यावेळी तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी धोका दिला. आम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आहोत.
.
रिपोर्टर: महाराष्ट्रात मध्यंतरी जे ऑपरेशन झालं त्यामध्ये आपला खारीचा वाटा होता. मात्र सर्वांना असा प्रश्न पडला की? देवेंद्र फडणवीस ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का? हे असं का झालं?
भूपेंद्र यादव: पार्टीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस पूर्ण क्षमतेने करत आहेत. पार्टीने मिळून हा निर्णय घेतला असून, तो निर्णय आपल्यासमोर आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासासाठी हे नव सरकार आहे. पार्टीच म्हणणं आहे केंद्राचे नीती आणि राज्याच्या विकासाला सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाणे त्यासाठी अतूट गटबंधनातून हे सरकार समोर आलय. हे ऑपरेशन वगैरे काही नाही हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे.
रिपोर्टर: यातून आपल्याला काय सुचवायचं होतं. असं सगळ्यांनाच वाटत होतं की, फडणवीस मुख्यमंत्री होतील परंतु हे अचानक असं काय झालं?
भूपेंद्र यादव: पार्टीचा हा निर्णय आहे, पार्टीची प्रतिबद्धता पद नाही. तर महाराष्ट्राचा विकास आहे.
रिपोर्टर: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल असं आपल्याला वाटतं?
भूपेंद्र यादव: त्यांचं भविष्य त्यांनाच पाहायचा आहे. तेच त्यांचं भविष्य अनिश्चित आहे. त्यांचा भविष्य ते सांगतील नाहीतर एखादा भविष्य सांगणारा सांगेल. पण मी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलतोय. लोकांमध्ये विश्वास आहे दोन अडीच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची गोष्ट आलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या टर्ममध्ये जे काम केलं, विकासाचं रोपट लावलं त्याला आता पुढे फळ लागतील. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मोठ्या मेहनतीने सरकार चालवत आहेत. राज्याच्या विकासाचे व्हिजन गेल्या दोन महिन्यातच समोर येत आहे.
रिपोर्टर: भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याकडे भाजप कसे पाहील?
भूपेंद्र यादव: भारतीय जनता पार्टीची सरकार इथे मजबुतीने काम करत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास करत आहे. भविष्याचा तुम्ही सांगत आहे, मात्र हे जमिनीवरचे सत्य आहे.
रिपोर्टर: गत लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील का? की काही जागा कमी होतील किंवा एखादा नवीन पक्ष येईल का?
भूपेंद्र यादव: आम्ही मजबुतीने काम करतोय. निवडणुका लढणार आहोत. सफलतेने हे सरकार सफलता प्राप्त करेल. तसेच याबाबत महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेऊ.
रिपोर्टर: महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी वाढल्यात. त्यामुळे याकडे केंद्राचे नेतृत्व कसं पाहतं आणि आता आणखीन एक जोडीदार तुम्हाला मिळू शकतो का?
भूपेंद्र यादव: महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात काम करतोय. वरिष्ठ नेते आशिष शेलार यांच्यावर मुंबईचे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. ते सक्षमपणे काम करत आहेत. ते महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आणतील. तेच स्थानीय पातळीवर या विषयावर निर्णय घेतील. मनसेच्या युतीबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार घेतील. मी हे मानतो एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करते आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ते प्राप्त करतील. आपले जे मनसेबाबतचे प्रश्न आहे त्यावर आशिष शेलार बोलतील.
रिपोर्टर: महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आपण दिल्लीतून कसं पाहता?
भूपेंद्र यादव: सगळ्यांचा विकास झाला पाहिजे लोकांमध्ये विश्वास आहे. कारण आम्हाला लोकांनी पूर्ण क्षमतेने निवडून दिलं होतं.पण त्यात धोका झाला. आता देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार निर्माण झालेला आहे, यासाठी मतदान केलं होतं ते आता पूर्ण झालं आहे. जनतेच्या विकासासाठी मेहनत करणारं सरकार आता आल्याचं लोकांना वाटतय.
रिपोर्टर: उद्धव ठाकरेंना काही सल्ला देऊ इच्छिता का?
भूपेंद्र यादव: ते माझं काम नाही. मी माझ्या पार्टीच्या नेत्यांसोबत काम करतो, मी इतरांना सल्ला देत नाही.