ST Mahamandal Latest Updates: शिंदे फडणवीस सरकारच्या (Maharashtra Govt निर्णयामुळे सणासुदीच्या पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार करायचे कसे असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नसल्याची माहिती मिळाली आहे.


एसटी महामंडळाचे प्रती महिना 450 कोटी रूपये उत्पन्न तर खर्च प्रती महिना 650 कोटी रूपये आहे.  एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी 310 कोटी, डिझेल 250 कोटी तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रूपये खर्च होतो. एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रूपये निधी मिळत असल्याने उर्वरित 200 कोटी रूपये आणायचे कुठून असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. 


सरकारच्या या निर्णयामुळं एसटी कर्मचाऱ्यांवर मात्र ऐन सणासुदीच्या काळात संक्रांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास पाच महिने संप केला होता. हा ऐतिहासिक संप ठरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. ठाकरे सरकारनं विलिनीकरणाची मागणी वगळता बाकी मागण्या मान्य करत एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली होती तसेच महामंडळाला आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती. आता शिंदे सरकारच्या काळात पुन्हा वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हं आहेत. 


दुसरीकडे  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी एसटी महामंडळाने ( ST Mahamandal ) करार पद्धतीने 800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. ते करार देखील संपवले आहेत.  आता आवश्यकता संपल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे या 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. दरम्यान या 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नयेत अशी मागणी काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या


Beed News : संप काळात कामावर घेतलेल्या 800 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारने कामावरून काढू नयेत: धनंजय मुंडे