Aurangabad News: औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील सोबलगाव गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, उकळलेल्या वरणात पडून पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. योगीराज नारायण आकोदे (वय 5 वर्षे, रा. हसनाबाद) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनाबाद येथील योगीराज नारायण आकोदे हा पाच वर्षीय बालक आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगाव येथे प्रदीप जाटवे या नातेवाइकाकडे आला होता. दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाटवे यांच्याकडून पाहुणचार करण्यासाठी वरण बनवण्यात येत होते. याचवेळी वरण बनविलेल्या भांड्याजवळ योगीराज आला. तर यावेळी तोल जाऊन उकळत्या भांड्यात तो पडल्याने तो गंभीर भाजला. त्याला उपचारासाठी तत्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच योगीराज आकोदे या बालकाचा मृत्यू झाला आहे. 


कुटुंबावर दुःखाचे डोंगर...


घरात पाहुणे आल्याने जाटवे यांच्याकडून घरात स्वयंपाकाची तयारी सुरु होती. त्यातच घरी आलेल्या आकोदे कुटुंबातील सदस्यांपैकी पाच वर्षीय योगीराजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच अचानक झालेल्या अपघातात योगीराज वरणाच्या भांड्यात पडला. त्यामुळे क्षणात घरात दुःखाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यातच उपचार सुरु असतानाच योगीराजच्या मृत्यूच्या बातमीने जाटवे आणि आकोदे दोन्ही कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. 


औरंगाबादेतील जंगलातांडा गाव हादरलं! बारा वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू; गावात तापेचे रुग्ण


घरातून निघून गेलेल्या बालकाचा विहिरीत मृतदेह


दुसऱ्या एका घटनेत, घरातून निघून गेलेल्या 13 वर्षीय बालकाचा एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील कानडगाव येथील सचिन कचरू शेळके हा बालक गुरुवारी दुपारी 2 वाजेपासून घरातून निघून गेला होता. त्याचा नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यामळे सचिनच्या कुटुंबीयांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. 


दरम्यान गावातील नागरिकांच्या सहकार्याने सचिनच्या नातेवाईकांनी त्याचा परिसरात शोध घेतला. दरम्यान महंमदपूर शिवारातील गट नंबर 106 मधील रामदास जाधव यांच्या विहिरीत सचिन शेळके याचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांकडून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाचे बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.