Aurangabad News: आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर कापूस चोरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कापसाला चांगला भाव मिळत असल्याने रात्रीतून कापूस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. मात्र यावर सोयगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. कारण कापूस चोरी रोखण्यासाठी या शेतकऱ्यांनी चक्क शेतातच विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे आपल्या शेतात कोण आलंय का? याचा लाबुनच अंदाज लावता येतो. 


त्याचं झाले असं की, सोयगावसह परिसरातील जरंडी, निंबायती, बहुलखेडा, या भागात वाढत्या कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. अतिवृष्टीमुळे कापसाची आवक घटल्याने दर चांगला मिळत आहे. त्यामुळे आहे तो थोडा-थोडा कापूस वेचण्यासाठी बळीराजाची धरपड सुरु आहे. मात्र अशात रात्री काही चोरटे येऊन शेतातील कापूस चोरून नेत आहे. या सततच्या घटनांनी शेतकरी देखील हतबल झाले आहे. त्यामुळे सोयगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पंपाच्या वीज जोडणीवरून जोडणी करून चक्क शेतीला उजेडात आणले आहे. यामुळे परिसरातील शेती क्षेत्र विजेच्या प्रकाशाने लख्ख झाले आहे. तर शेतात रात्री चोरीसाठी येणारे चोर लांबूनच पळ काढत आहे. 


अशी सुचली कल्पना...


शेतातील कापूस चोरीला जात असल्याने गुरुवारी रात्री कपाशीच्या राखोलीसाठी काही शेतकरी शेतात ठाण मांडून होते. दरम्यान परिसरातील जरंडी शिवारातील शेतकरी राजेंद्र चौधरी यांच्या गट क्र-333  मध्ये कापसाची अंधारात चोरी होत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यामुळे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधार असल्याने त्याचा फायदा घेत कपाशीच्या शेतातून अवघ्या पाच फुटावरून चोरट्यांनी पळ काढला. अंधार असल्याने चोरटे शेतकऱ्यांच्या हातून निसटले. त्यामुळे जर शेतात रोषणाई असती तर चोरटे हाती लागले असते आणि यामुळे लांबूनच शेतात येणाऱ्या चोरट्यांवर लक्ष ठेवणे देखील सोपे होणार असल्याचं शेतकऱ्यांना सुचले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून अनेक शेतकऱ्यांनी शेतात विद्युत रोषणाई करण्यास सुरवात केली आहे. 


अशी होते कापूस चोरी.... 


सद्या कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यातच कापसाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. रात्रीच्या अंधारात चंद्राच्या प्रकाशात कापसाचे बोंडे स्पष्ट दिसतात. अशात काही चोरट्यांची टोळी पॅन्टला लांब लचक खिसे तयार करून शेतात घुसतात. तसेच कापूस वेचणी करून बांधावर त्याला एकत्र करून, धूम ठोकतात. रात्रीतून तब्बल एका शेतातून पंचवीस ते तीस किलो प्रमाणे कापूस चोरी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे.