Sanjay Raut Bail : गेल्या 100 दिवसांपासून कारागृहात असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. तर यावरच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं आहे. सोबतच आता आमचा ढाण्या वाघ येणार आहेत असेही खैरे म्हणाले. 


यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, संजय राऊत यांना 100 दिवसांनी जामीन मिळाला असून, यामुळे खूप आनंद झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आभार मानतो. संजय राऊत एकनिष्ठ नेता होते, ते कधीच डगमगले नसून त्यांच्या लेखणीचा हा विजय आहे. मरून जाईन पण शिवसेना सोडणार नाही हे संजय राऊत अनकेदा बोलले. आता हे जे 40 गद्दार आहेत, त्यांनी उदाहरण घेतले पाहिजे. दबाव टाकणारे आज सर्व उघडे पडले असून, हा सत्याचा विजय झाला आहे. त्यामुळे आज मिळालेला जामीन हा एकनिष्ठेचा जामीन आहे. त्यामुळे उद्यापासून आमचे ढाण्या वाघ येणार असल्याच खैरे म्हणाले. 


शिवतारेंना उत्तर...


पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, किरीट सोमय्या सारखा माणूस काहीतरी बोलत असतात. त्यामुळे याचे काय,त्याच काय हे काढत बसतात. लोकांनी सेवा करण्यासाठी पाठवले असतांना त्यांना ते दिसत नाही. शिंदे गटाचे विजय शिवतारे पन्नास खोकेच्या आरोपांवरून आमच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. त्यांना आमचे म्हणणे आहे की, तुम्ही न्यायालयात जाचं, यातून तुम्हीच उघडे पडणार असल्याच खैरे म्हणाले.


तीन वाजता निर्णय...


तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे यावर आता दुपारी तीन वाजता निर्णय होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळणार की, मुंबई सत्र न्यायालय आपला निर्णय कायम ठेवणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मात्र दुसरीकडे सर्वत्र ठाकरे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे. तर आज संध्याकाळी शिवसेना भवनात जल्लोष देखील केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.