Vegetables News : सध्या राज्यातील अनेक ठिकाणी भाजीपाल्यांची (vegetables) आवक वाढली आहे. यामुळं दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dhule Agricultural Produce Market Committee) देखील मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळं तिथेही दरात घसरण झाली आहे. दर घसरल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर दुसरीकडं दर घसरल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. याचा फायदा फळ भाज्यांच्या शेतीला झाला असून, भाज्यांचं उत्पादन वाढलं आहे.
पावसामुळं प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ
धुळे शहरासह जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. कापूस, सोयाबीन आणि मका यासह विविध पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र या झालेल्या पावसामुळं जल प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण झाला आहे. याचा फायदा फळ भाज्यांच्या शेतीला झाला असल्यानं भाजीपाल्याचे उत्पादन वाढलं आहे. यामुळं बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यानं दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तर याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आता थंडीचा तडाखा जाणू लागला असून, यामुळं या थंडीचा फायदा इतर पिकांसोबत भाजीपाल्यांना देखील होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
धुळे बाजार समितीत जिल्ह्यातील कापडणे, नगाव, मूकटी, कुसुंबा, धमाने, फागणे हेंदरुन, मोघन, आर्वी , शिंदखेडा पारोळा, अमळनेर या ठिकाणाहून भाज्यांची आवक होते. दरम्यान, सध्या भाज्यांच्या दरात घसरण झाल्यानं सर्वसामान नागरिकांकडून मागणी वाढली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
पाहा कोणत्या भाजीला किती दर ?
पालक 30 ते 40 रुपये किलो
मिरची 40 ते 50 रुपये रुपये किलो
वांगे 40 ते 50 रुपये किलो
बटाटे 30 ते 40 रुपये किलो
फुलकोबी 25 ते 30 रुपये किलो
टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो
भरीताचे वांगे 50 ते 55 रुपये किलो
कोथिंबीर 40 ते 50 रुपये किलो