Chandrakant Khaire: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाल्यास सरकार पडण्याच्या भीतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. मात्र काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या टिकेनंतर खैरे यांनी आपले विधान मागे घेतले आहे. सोबतच दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. कोणाचे मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, मी फक्त सावध करण्यासाठी असे बोललो होतो असे खैरे म्हणाले आहे. 


यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, काँग्रेसचे 22 आमदार देवेंद्र फडणवीस फोडणार असल्याचा उल्लेख काल आमच्या भाषणात आला होता. मुळात ही बातमी खूप जुनी आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे म्हणून असे मी बोललो होतो. परंतु आमचे मित्र नाना पटोले यांची माझ्या विधानामुळे नाराजी झाली आहे. म्हणून त्यांची नाराजी दूर करतो. तसेच भाजप फोडणार आणि काँग्रेसचे आमदार जाणार असे म्हणण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे माझे वक्तव्य मागे घेत आहे. तसेच कोणाचे मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही खैरे म्हणाले. महाविकास आघाडीत वाद होऊ नयेत यासाठी आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचं देखील खैरे म्हणाले. 


काय म्हणाले होते खैरे...


औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलतांना खैरे म्हणाले होते की, लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले होते. खैरेंच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर ज्यांना सत्तेत असलेला आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा खोचक टोला नाना पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. 


अब्दुल सत्तार हे हिरवा साप...


दरम्यान याचवेळी बोलतांना खैरे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. आता मी सत्तार यांना सरळ करणार असून, मला त्यांच्यावर प्रचंड राग आला आहे. सत्तार हे हिरवा साप, सरडा असून, मला प्रचंड घाबरतात. त्यामुळे या हिरव्या सापाला ठेसण्याचं काम करणार आहे.सत्तार रिकामी बडबड करतात, सतरा ठिकाणी फिरून आले असल्याचे देखील खैरे म्हणाले.