Aurangabad News: ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा घेण्यात आला. त्यामुळे भाजपकडून औरंगाबादमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीवर हा जल्लोष करण्यात येत असून, कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरु झाली आहे. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. 


नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र त्यांनतर शिंदे सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. या टिकेनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीला यश मिळाले असून, भाजपकडून शहरात जल्लोष करण्यात येत आहे. यावेळी ढोल-ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला. तर उपस्थित नेत्यांनी एकमेकांना पेढे खाऊ घालून आनंद साजरा केला. यावेळी महिला पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. 


शिवसेनेकडून टीका...


शिंदे सरकारच्या निर्णयावर बोलतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, नामांतराच्या मागणीसाठी आम्ही 1988 पासून आंदोलन करत आहोत. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला काल यांनी स्थगिती दिली होती. आम्ही त्याचा निषेध व्यक्त केल्यानेच हे जागे झाले आणि त्यामुळेच आज निर्णय घेण्यात आला असल्याचे खैरे म्हणाले. त्यामुळे आता इथला निर्णय झाला असून, लवकर यांनी दिल्लीतून नामांतराच्या निर्णयाला मंजुरी मिळवून आणावी अशी मागणी खैरे यांनी केली आहे. तसेच एक महिन्यात हा निर्णय झाला नाही तर यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे.


महत्वाच्या बातम्या...


पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय


Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिपदासाठी शिंदे गटात 'मारामाऱ्या' होतील; खैरेंचा खोचक टोला