Gangapur Sugar Factory Election: औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर सहकारी साखर कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांना मोठा धक्का बसला आहे. तर महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा फडकवला आहे. प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली होती. ज्यात डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे. तर 20 पैकी 20 जागा डोणगावकर यांच्या पॅनेल जिंकल्या असून, खुद्द प्रशांत बंब यांचा लासूर गटातून पराभव झाला आहे. काही वेळेत अधिकृतपणे याची घोषणा करण्यात येणार आहे. 


गंगापूर साखर कारखान्यासाठी रविवारी झालेल्या या निवडणुकीत एकूण 54 टक्के मतदान झाले होते. एकूण 14 हजार 66 मतदार सभासदांपैकी 7 हजार 598 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर एकूण 21 संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने 20 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते. यासाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. दरम्यान संध्याकाळी उशिरा निकालाचे आकडे समोर आले असून, बंब यांच्या शेतकरी सभासद कामगार पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. तर शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने संपूर्ण 20 जागांवर विजय मिळवला जात आहे. त्यामुळे बंब यांच्या साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या आणि विद्यमान आमदार असून देखील बंब यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात हा निकाल चर्चेचा विषय बनला आहे. 


कार्यकर्त्यांचा जल्लोष...


दरम्यान निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच, आमदार बंब आणि त्यांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावरून निघून गेले आहेत. तर डोणगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला आहे. यावेळी त्यांच्या शिवशाही पॅनेलच्य विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत विजय साजरा केला आहे. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. तर आमचा विजय झाला असल्याचं म्हणत, कृष्णा डोणगावकर यांनी देखील विजयाचा जल्लोष साजरा केला. 


मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त... 


कारखाना बंद असला तरी तो ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पॅनेलच्या वतीने प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारखाना आपण कोणत्याही परिस्थितीत चालू करणार असल्याचा दावा दोन्ही गटाच्या वतीने प्रचारादरम्यान करण्यात आला होता. तर आजच्या निकालाकडे गंगापूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे पोलिसांकडून सकाळपासून मतमोजणी केंद्रात आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस लक्ष ठेवून होते. 


Aurangabad: गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, प्रशांत बंब यांची प्रतिष्ठा पणाला