Nashik Eknath Shinde : पाणी योजना किती महत्वाची आहे, हे मनमाडला (Manmad) आल्यावर लक्षात आले. ही पाणी पुरवठा मनमाडकरांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविणार आहे. जर एक एक महिना जर पाणी मिळत नसेल तर आमचा उपयोग काय? पण मागचं सरकार असत तर ही योजना झालीच नसती असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 


आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते नांदगाव मतदारसंघातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी योजनेसह विविध सेवांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलते होते. यावेळी ते म्हणाले कि, पाणी हे जीवन आहे, मात्र पाणी किती महत्वाचे आहे हे मनमाड शहरात आल्यावर समजले. जर पंधरा-वीस दिवस पाणी मिळत नसेल तर किती कठीण आहे. आपल्याला कांदे (Suhas Kande) यांनी सांगितल्याबरोबर मंजुरी दिली. त्याचबरोबर या योजनेसाठी 15 टक्के निधी आहे, तो सुद्धा राज्य सरकार देईल, मनमाडकरांना दररोज पाणी मिळण्याची व्यवस्था केली जाईल, हे पाणी पुरवठा मनमाडकरांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्राला भरभरून देत आहे, नुकतीच रेल्वेसाठी 13 हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली. आता मागच सरकार असत तर ही पाणी योजना झालीच नसती, आपण काम करत राहायचं, त्यांना आरोप करू द्या, तुम्ही करत राहा, मनमाड रेल्वेचे जंक्शन आहे, त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय मनमाडकर तुम्ही योग्य माणूस निवडला आहे, म्हणून कामे होत आहे, कमी बोलून जास्तीचे काम होते आहे. उधारी ठेवत नाही, म्हणून सगळे काम सुरु आहेत. मनमाड नगरपालिकेला दहा कोटी दिले, विमानात बसेपर्यंत ऑर्डर आली असेल, त्याचबरोबर मनमाड शहरात 275 एकरवर औद्योगिक वसाहत होणार असून त्याचे भूसंपादनाचे काम एका महिन्यात सुरु होईल, ट्रामा सेंटर देण्याचेही काम करू, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 


ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने गेल्या सहा ते सात महिन्यात लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दीड लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या मनमाड शहरातील लोकांसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आमुलाग्र बदल घडवणारी असल्याचे म्हटले. तसेच आमदार सुहास कांदेंनी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिल्याने त्यांना या मतदारसंघातील महिलांचा आशीर्वाद मिळाला आहे. ज्या योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना सुरु झाल्या होत्या, त्या योजना अडीच वर्षात थांबल्या, मात्र मागील सहा महिन्यात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्या तात्काळ सुरु केल्याचे शिंदेंनी सांगितले.