Nashik Crime : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात दोन राष्ट्रीयकृत बँकांवर (national Bank) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नाशिक सायबर पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे. या फसवणूक प्रकरणी बँक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. 


सध्या इंटरनेटचे युग असल्याने अनेकदा सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना नाशिक शहरातील निवृत्त आर्मी अधिकऱ्यांसमवेत घडली. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन नॅशनल बँकांचा समावेश असल्याचे उघड झाले. या बँकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. ऑनलाईन फसवणूकीबाबत दोन राष्ट्रीयकृत बँकांवर गुन्हा दाखल प्रकरणी नाशिक सायबर पोलीसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank Of India) नोटीस बजावली आहे. त्यानुसार या बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. 


नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात राहणारे अविनाश पवार यांच्यासोबत ही घटना घडली. ते निवृत्त इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस अधिकारी आहेत. पवार यांची कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेण्याच्या नावाखाली 7 लाख 29 हजारांची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक करणारे व्हॉट्सऍप नंबर धारक, फसवणुकीची रक्कम वर्ग झालेले पंजाब नॅशनल बँक खातेधारक, help@itc-portal.org.in ही बनावट वेबसाईट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब नॅशनल बँक यांच्यावर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्याअंतर्गत नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता सायबर पोलिसांनी या प्रकरणाचे धागे दोरे तपासण्यासाठी कंबर कसली आहे. 


त्यानुसार या प्रकरणातील स्टेट बँकेला नाशिक सायबर पोलिसांनी रीतसर नोटीस बजावली आहे. या प्रकरणी संबंधित बँकेतील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात येऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. अशा पद्धतीची फसवणुकीचे हे वेगळेच प्रकरण नाशिकमध्ये समोर आले. ज्यामध्ये बँकांचा सुद्धा समावेश असल्याचे अधोरेखित होते आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीचा हा काही नविन फंडा तर नाही ना? राष्ट्रीयकृत बँकांचे सर्व्हर खरच सुरक्षित आहेत का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. 



डिस्ट्रिब्युटरशिपच्या नावाखाली फसवणूक 


पवार यांनी निवृत्तीनंतर काहीतरी व्यवसाय करायचा होता. त्यामुळे ते एका डिस्ट्रिब्युटरशिप देणाऱ्या कंपनीच्या शोधात होते. अशातच त्यांनी सोशल मीडियावर माहिती मिळवून डिस्ट्रिब्युटरशिप मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अनेकांनी कॉल, मेल्स करून त्यांच्याकडून विविध मार्गानी पैसे उकळले. यात दोन राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. जवळपास सात लाखाहून अधिक रक्कमेची फसवणूक करण्यात आली. पवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानन्तर त्यानी थेट पोलीस ठाणे गाठत संबंधित मोबाईल नंबर, बँक विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला. सद्यस्थितीत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.