Aurangabad News: औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात गेल्या सात महिन्यात विक्रमी मद्य विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या सात महिन्यात औरंगाबादकरांनी तब्बल 1 कोटी 75 लाख 99 हजार 100 लिटर दारू रिचवली आहे. ज्यामुळे मागील सात महिन्यात मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये 'पिले पिले ओ मेरे राजा' जोरात सुरु असल्याचं म्हणता येईल. 

औरंगाबाद शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणावर धाबे आणि हॉटेल वाढल्या आहेत. ज्यात अधिकृत मद्य विक्रीचा परवाना असलेल्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे धाब्यावर बसून बिनधास्त दारू पिणाऱ्यांची देखील संख्या वाढली आहे. अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाब्यावर आणि हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू उपलब्ध करून देणाऱ्यासह पिणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीला लगाम पाहायला लागल्याचे मिळत आहे. तर दुसरीकडे मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सात महिन्यात शासनाला मद्य विक्रीतून तब्बल 2,784 कोटी 89 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने ठरवून दिलेलं टार्गेट औरंगाबाद उत्पादन शुल्क विभागाकडून पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल पडत असल्याचे दिसत आहे. 

अशी झाली मद्यविक्री (1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत आकडेवारी) 

प्रकार  2022-2023 2021-2022 वाढ (टक्केवारी)
देशी दारू  93,87,705 78,45,245 19.07 टक्के 
विदेशी दारू  40,95,018 30,38,963 34.08 टक्के 
बीअर  40,20,322 22,13,243 81.06 टक्के 
वाइन  96,055 59,122 62.05 टक्के 

कारवाईचा धडाका...

औरंगाबादसह मराठवाडा विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या काही महिन्यांपासून अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या धाबे चालक आणि हॉटेल विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे कारवाईनंतर तत्काळ दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हजारो रुपयांचा दंड मिळत असल्याने अनेक हॉटेल चालक आणि धाबे चालकांनी कानाला हात लावत अवैधरीत्या दारू विक्री बंद केली आहे. तर अशा ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल होत असल्याने नागरिक आता अधिकृत बारमध्ये जातांना पाहायला मिळत आहे. परिणामी मद्यविक्री महसुलात वाढ होतांना पाहायला मिळत आहे. 

Aurangabad: हाताला काम मिळेना, त्यात दारूचे वांदे; जीव देण्यासाठी तरुण थेट पोहचला रुळावर