Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 68 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. आज राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सांगलीवरुन (Sangli) 10 हजार नागरिक भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. सांगलीकरांच्या वतीने माजी मंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) राहुल गांधींचे स्वागत करणार आहेत.
दरम्यान, काल भारत जोडो यात्रा हिंगोलीच्या कळमनुरी शहरात विश्रांतीसाठी थांबली होती. त्यानंतर आज सकाळी यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला आहे. सकाळी पुन्हा कडाक्याच्या थंडीमध्ये भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. या भारत जोडोमध्ये राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सांगली वरुन हजारो नागरिक दाखल झाले आहेत. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते हिंगोलीत दाखल झाले आहेत.
भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक नवी उर्जा : विश्वजीत कदम
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही लोकांमध्ये त्याचे आकर्षण असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडमधून राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन यात्रेला सुरुवात केली होती. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात या भारत यात्रेची मोठी चर्चा सुरु होती. आज सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पदयात्रेत सामील होण्याचा दिवस होता. आज आम्ही पारंपारिक पद्धतीनं राहुल गांधी यांचे स्वागत करणार असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. या यात्रेमुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक नवी उर्जा मिळाली आहे. पुढच्या काळात निवडणुकीमध्ये काँग्रेसला याचा फायदा होणार असल्याचे कदम यावेळी म्हणाले. भारत जोडो यात्रेच्या मार्गाच्या सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना मिळालेली ही ऊर्जा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात, शहरात आणि प्रत्येक गावात पोहोचणार असल्याचे विश्वजीत कदम यावेळी म्हणाले.
काँग्रेसची भारत जोडी यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. तामिळनाडूनंतर ही पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान 382 किमी अंतरचा प्रवास होणार आहे. ही यात्रा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: