Aurangabad News: आत्ताची एक मोठी बातमी समोर येत असून, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी(Aurangabad City Police) नोटीस पाठवली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याचा दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी राज यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.
औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची 1 मी रोजी सभा झाली होती. मात्र या सभेसाठी राज ठाकरेंना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी कलम 116, कलम 117 आणि कलम 153 अंतर्गत राज ठाकरेंविरोधात दाखल गुन्हा प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहावे असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांना ही नोटीस स्पीड पोस्टाने पाठवली आहे.
राज ठाकरेंकडून नियमांचं उल्लंघन
औरंगाबाद येथे झालेल्या सभेला अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी या सभेत अनेक अटीं आणि शर्तींच उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. तर याच सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. ज्यात सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.