Maharashtra Politics Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपमधील (BJP) राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाल आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार असा बोचरा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.


'मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन'चा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की,  आचारविचार काहीही नसलेल्या भाजपला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. मात्र, मराठी माणूस ती कदापीही पूर्ण होऊ देणार नसल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 


कोरोना काळात मुख्यमंत्री घरीच थांबले होते, आत्मग्न होते अशी टीका भाजपकडून सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या टीकेलाही उत्तर देताना म्हटले की, गेली अडीच वर्ष मी 
मी आत्ममग्न होतो असल्याचे विरोधक म्हणतात. होय, मी आत्ममग्न राहिलो. महाराष्ट्र माझा आत्मा आहे. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी आत्ममग्न होतो आणि भविष्यातही राहीन’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. 


सध्याचे मुख्यमंत्रीच कंत्राटी; एकनाथ शिंदेवर टीकास्त्र


उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नाचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील कंत्राटी आहेत.  त्या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही असा टोला ठाकरे यांनी लगावला. राज्यात सध्या दोन चाकी 'ईडी' सरकार आले असल्याची टीका त्यांनी केली. 


महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी आणि कामगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अनेक गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार केले. कागदावरील ती गुंतवणूक प्रत्यक्ष जमिनीवर आणली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले. मात्र, आज ज्यांची सुरुवातच खोक्यांपासून झाली ते कोणाची प्रगती करणार? पुढे काय होणार? हे जनतेला दिसत आहे. त्यामुळे आम्ही विकासासाठी एकत्र आलोय अशी कोणी टिमकी मिरवू नये, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


शेरास सव्वा शेर मिळतोच; भाजपला टोला


काँग्रेस नेते स.का. पाटील यांचा मोठा दरारा होता. त्यांच्याविरोधात कोण उभं राहणार, असा प्रश्न होता. पण, तत्कालीन कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी स. का. पाटील यांचा मोठा पराभव केला. आम्हाला कोणू हरवू शकत नाही असे समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. त्यांनी शेरास सव्वा शेर मिळतो हे विसरू नये असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.


दसरा मेळावा शिवाजी पार्कवर


कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष कोणताही मोठा कार्यक्रम खुल्या मैदानात घेता आला नव्हता. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होईल असेही त्यांनी सांगितले.