Pimpri-Chinchwad news : पिंपरी-चिंचवडच्या(PCMC)  'महावितरण'च्या कनिष्ठ अभियंत्याने विजजोड बंद करण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.  'महावितरण'च्या कनिष्ठ अभियंत्याने पन्नास हजार रुपये लाच म्हणून मागितली आहे. लाचखोरीचा गुन्हा दाखल करून या अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज ताब्यात घेतले. संतोष कुमार गित्ते असं 31 वर्षीय लाचखोर अभियंत्याचं नाव आहे.


संतोष कुमार गित्ते हे महावितरणच्या भोसलीच्या उपविभागात ज्युनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. त्यांनी वीजजोड बंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली आहे. वीज कनेक्शन करण्यासाठी पिंपरीतील एका व्यक्तीने अर्ज केला होता. त्यांना त्यांच्या कंपनीचं वीज कनेक्शन बंद करायचं असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यासाठी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. त्यांनी ही लाच द्यायची नव्हती त्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागात तक्रार केली. अखेर लाचलुचपत विभागाने या अभियंत्यावर कारवाई केली. त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.  अशाप्रकारे शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असेल, तर 1064 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.


महिनाभरात दुसरी घटना
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या सर्वेअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. ही कारवाई दुपारी अडीचच्या सुमारास झाली होती. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली होती. संदीप लबडे असे लाच घेणाऱ्या सर्वेअरचं नाव होतं. लबडे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात सर्वेअर म्हणून कार्यरत होते. लबडे यांनी आधी तीन आणि काम झाल्यानंतर साडेतीन लाखांची लाच मागितली होती. तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे विकास योजनेचा अभिप्राय देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. महापालिकेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे यापूर्वीच महापालिका विभागात कारवाई करण्यात आली आहे. दुपारीच लबडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते.



टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन


पुणे शहरात सतत लाचलुचपतीचे प्रकरणं समोर येत आहेत. त्यात शासकीय कामासाठी किंवा अन्य कामासाठी लाच मागितल्याचे प्रकरणं जास्त प्रमाणात आहे. या सगळ्यांवर आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभाग कायम कार्यरत असतं. त्यामुळे शासकीय कामांसाठी जर अशा प्रकारची लाच मागण्याचा कोणी प्रयत्न केला तर 1064 या टोल फ्रीनंबरवर संपर्क करण्याचं आवाहन लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलं आहे.