Maharashtra Jalgaon News : जळगाव (Jalgaon) शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नादुरूस्त रस्त्यांसाठी अनेक संघटनांनी आंदोलनं केली. मात्र रस्त्यांची स्थिती जैसे थेच आहे. आता या रस्त्यांची कामं व्हावीत, यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे रस्त्यावर उतरले आहेत. काल (शुक्रवारी) एकनाथ खडसेंनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी केली. डांबर न टाकता रस्त्यांची कामं होत असून यावरुन एकनाथ खडसेंनी संताप व्यक्त करत या निष्कृष्ट कामांना विद्यमान जबाबदार असल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी नाव न घेता सत्ताधारी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याच बगलबच्च्यांना कंत्राट देवून सत्ताधारी मंत्री विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करत असल्याचा आरोपही यावेळी एकनाथ खडसेंनी केला. 


जळगाव शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची एकनाथ खडसेंनी पाहणी केली. महापालिकेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या महापौर जयश्री महाजन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी खडसेंसोबत होते. आधीच नादुरूस्त रस्ते तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी ज्या रस्त्यांची कामं झाली. तीदेखील निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. रस्त्यांबरोबरच शहरातील भूमिगत गटारं, अमृत योजना, घनकचरा प्रकल्प या सर्वांची कामं अूपर्णावस्थेत असून महापौर जयश्री महाजन यांच्यासमोरच खडसेंनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यानंतर स्वत:ची बाजू सावरुन घेत, खडसेंनी केवळ रस्त्यांच्या कामांबाबत बोलत असून यात महापालिकेचा काही संबंध नाही, असं स्पष्टीकरणही पत्रकारांशी बोलतांना दिलं. 


मंत्री गिरीश महाजनांनी जळगाव शहराचा विकास केला नाही तर, मत मागायला येणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. विकास तर झाला नाही, उलट जळगाव शहराचं वाटोळं झालं. आपल्याच बगलबच्च्यांना कंत्राटं मिळवीत म्हणून रस्त्यांची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली, आणि त्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नाव न घेता खडसेंनी विद्यमान मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला. 


ज्या आमदारांना जनेतेनं निवडून दिलं, ते स्थानिक आमदार, खासदारसुध्दा याला जबाबदार असल्याचं सांगत खडसेंनी आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. जनतेचा पैसा वाय जात आहे, आता जनतेनं ज्यांना मतं दिली, ज्यांनी विकासाची मोठमोठी आश्वासनं दिली, अशांना जाब विचारण्याची गरज आहे, जे कामं करतील त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, असं जनतेला आवाहन करत खडसेंनी या रस्त्यांसंदर्भात विधानसभेत आवाज उठविणार असल्याचं सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला आहे.