Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपकडून उमेदवारी देताना पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावर प्रतिक्रीया देताना जलील यांनी पंकजा मुंडेंना भाजपची साथ सोडून स्वतःचा नवीन पक्ष काढून ओबीसी नेत्या होण्याचा सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात वारंवार डावललं जात असून, समाजासाठी त्यांनी हे पाऊल उचलावे असंही जलील म्हणाले आहे.
काय म्हणाले जलील...
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप पक्ष देशात वाढवला तो नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी वाढवला नाही. पण आज त्या लोकांना बाजूला केलं जात आहे. त्यामुळे मी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे की, तुम्ही कशाला विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या मागे लागला आहात. एवढा मोठा ओबिसा समाज असताना त्यांना नेता नाही. त्यामुळे तुम्ही ओबीसी नेत्या होण्याची संधी सोडू नका. MIM ला देखील एका चांगल्या मित्राची गरज आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी जर पक्ष काढला तर, त्या आत्ता ज्या नेत्यांच्या मागे फिरत आहेत. तेच नेते पंकजा मुंडे यांच्या मागे फिरतील.
विधानपरिषदेत MIM कुणाला मत देणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुणाला पाठींबा देणार यावर बोलताना जलील म्हणाले की, माझं वैयक्तिक मत जर विचारले तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचे काम चांगले आहे. मी त्यांना कधी भेटलो नाही, पण ज्यावेळी ते मंत्री होते तेव्हा त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या समाजासाठी खूप काम केले आहे. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा संधी मिळावी असे माझ वैयक्तिक मत आहे. पण यावर आमच्या दोन आमदारांशी आम्ही चर्चा करू आणि त्यांनतर यावर निर्णय घेऊ असे जलील म्हणाले.
दानवेंचं उत्तर...
पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष काढावा असे जलील म्हणाले असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, राजकारणात दुसऱ्यामध्ये कसा खोडा घालता येईल असा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. जलील म्हणाले म्हणून पंकजा मुंडे त्यांना प्रतिसाद देतील असं काही नाहीत. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे अशा कुणाच्या बोलण्यावरून त्या निर्णय घेतील असे काही नाही. पंकजा मुंडे यांच्याबद्दल पक्ष योग्य त्या ठिकाणी नक्कीच विचार करेल याची मला खात्री असल्याच दानवे म्हणाले.