Dhule Latest Crime News : अवैध सावकारी प्रकरणाने गेल्या पंधरा दिवसात धुळे जिल्हा हादरला असताना आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. एका अवैध सावकाराने  ट्रॅव्हल्स चालकाला दोन लाखांचे कर्ज दिले, त्या बदल्यात 22 लाखांची वसुली केली. तरीदेखील रोजीरोटीचे साधनच असलेले दुकान हिसकावले, दुकान ताब्यात हवे असेल तर 11 लाख रुपये दे, अशी खंडणी मागितली. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारात सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी त्या सावकाराने दुसरा सावकार शोधून दिला. दुसऱ्याच्या कर्जाची फेड करण्यासाठी तिसऱ्या सावकाराकडून पैसे मिळवून दिले, या तिघांनी मिळून ट्रॅव्हल चालकाचे आर्थिक शोषण केल्याचं समोर आलेय.  एवढेच नव्हे तर वेळोवेळी धमक्या दिल्या शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तीन अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धुळे शहराच्या देवपुर भागातील अनमोल नगरात राहणाऱ्या निलेश श्रीराम पवार हे साईराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने व्यवसाय करतात. 2016 मध्ये व्यवसायात आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर व्यापारी वर्गात व्याजाने पैसे देणाऱ्या गणेश रमेश बागुल याला भेटले. व्यापारासाठी आणि बँकेच्या कर्जाची थकीत हप्ते भरण्यासाठी रमेश बागुल यांनी व्याजाने पैसे देण्याचे कबूल केले. निलेश पवार यांनी 2 फेब्रुवारी 2016 मध्ये दहा टक्के दरमहा व्याज याप्रमाणे त्यांनी दोन लाख रुपये घेतले. रमेश बागुल ठरल्याप्रमाणे ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात येऊन नियमित पैसे घेऊन जात होता. त्याची नोंदही निलेश पवार यांनी वहीत करून ठेवली आहे. दोन फेब्रुवारी ते 3 जून दरम्यान 1 लाख 91 हजार पाचशे रुपयाची फेड पवार यांनी केली. मात्र त्यानंतर व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने रमेश बागुल यांना नियमित पैसे देणे शक्य होत नव्हतं. त्यातून हा अवैध सावकार घरी आणि दुकानावरून येऊन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन पैसे मागू लागला. अनेक वेळा विनवण्या करून देखील निलेश पवार ही वेळ मारून नेत होते.


दरम्यानच्या काळात तुला पैसे देणे होत नसेल तर माझ्या मित्राकडून काढून देऊ शकतो असे सांगितले. रमेश बागुल यांचा वाढत चाललेला त्रास बंद होईल या आशेने त्याच्या मित्राकडून कर्ज घेण्यास निलेश पवार हे तयार झाले. जून 2016 मध्ये रमेश बागुल याचा मित्र निलेश हराळ यांच्याकडून दोन लाख रुपये पाच टक्के दरमहा व्याजाने घेतले. या दोन लाख रुपयातील दीड लाख रमेश बागुल याने व्याज आणि दंडापोटी काढून घेतले. हातात फक्त 50 हजार रुपये दिले, त्यानंतर सावकारीच्या चक्रात निलेश पवार हे आणखीनच अडकत गेले. 7 मार्च 2017 ते 31 मार्च 2019 या काळात 3 लाख 74 हजार रुपये वेळोवळी निलेश हरल याला दिले. त्याच्या नोंदी देखील निलेश पवार यांच्याकडे आहेत.


याशिवाय शिरपूर पीपल्स बँकेच्या खात्यातून निलेश आणि त्यांचा भाऊ राजेंद्र हराळ यांना पैसे दिले, मार्च 2019 मध्ये ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्याने आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली त्यामुळे रमेश बागुल आणि निलेश हरल यांना पैसे देणे शक्यच नव्हते. दरम्यानच्या काळात निलेश पवार यांची MH18 AJ 2256 या क्रमांकाची स्विफ्ट कार दमदाटी करून या सावकारांनी बळजबरीने हिसकावून घेतली. निलेशचा नातेवाईक वाल्मिक हरल यांच्याकडे ऑक्टोबर 2019 मध्ये दोन लाखात त्यांनी आपले वाहन परस्पर गहाण ठेवले. वाल्मिकने व्याजापोटी दहा हजार रुपये काढून घेतले. रमेश बागुल याने 50 हजार रुपये घेतले तर उरलेले 1 लाख 40 हजार रुपये निलेश हरळ यांनी ठेवून घेतले हातात काही पडलेले नसताना दहा हजार रुपये महिना व्याज वाल्मिक याला ठरलेला द्यावे लागतील असे दोघं सावकारांनी निलेश यांना सांगितले. या दोघा सावकारांकडून कशीबशी सुटका केल्याचा समज आता निलेश पवार यांचा झाला. त्यानंतर निलेश पवार हे वाल्मीक हरल याला पैसे देऊ लागले.


नोव्हेंबर  2019 ते जून 2020 या काळात त्यांनी 80 हजार रुपये रोख वाल्मीक हरळ याला देऊ लागले, यानंतर कोविडच्या काळात वाहनाची अत्यंत गरज असल्याने निलेश यांनी सावकारांकडे कारची मागणी केली, यावेळी तिघांनी कार परत करताना वरून 2 लाख रुपये देतो, असे सांगत त्यांचे ठाकरे संकुल येथे असलेले साईराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे कार्यालय आमच्या नावावर करून दे असे सांगितले. व्याज आणि दंडाच्या चक्रात तसेच मुलाच्या उपचाराची सोय होत नसल्याने निलेश पवार यांनी नाईलाजाने स्टॅम्पवर दुकान लिहून दिले.


सावकाराकडून मिळालेले दोन लाख रुपये वाल्मिक हरळ याला देऊन कार ताब्यात घेतली. कर्जाची परतफेड करून देखील तिघा सावकारांनी निलेश पवार यांचे साईराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे कार्यालय हिसकावण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याने वारंवार विनंती करून देखील सावकारांनी पूर्णपणे लूट केली. तसेच एकदा त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली, यानंतर निलेश पवार यांनी धुळे शहर पोलीस ठाणे गाठत अवैध सावकारी विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तिघेही आरोपी रमेश बागुल, निलेश हरळ आणि महेश हरळ हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र धुळे शहर आणि जिल्ह्यात वाढलेली अवैध सावकारी पुन्हा एकदा समोर आली.