Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाचोड येथील कल्याणनगर भागातून तब्बल साडेपाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 55 वर्षीय इसमाचा हा मृतदेह असल्याचे समोर आले आहे. पाचोडजवळील नाल्यात झाडावर कुजलेल्या अवस्थेत शनिवारी रात्री फासावर लटकलेला मृतदेह आढळून आल्याने याची माहिती पाचोड पोलिसांना (Pachod Police) देण्यात आली होती. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. बबन बेगाजी भोजने (वय 55 वर्षे), असे मयताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर बेगाजी भोजने यांनी पाचोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे भाऊ बबन बेगाजी भोजने हे 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे घरून बसस्थानकावर चहा घेण्यासाठी गेले होते. मात्र, नंतर परत आले नाहीत. त्यामुळे भोजने परिवाराने त्यांचा सगळीकडे शोध घेतला होता. मात्र, ते सापडले नाहीत. शेवटी रामेश्वर भोजने यांनी 8 सप्टेंबर रोजी पाचोड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
झाडावर कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!
बबन बेगाजी भोजने यांचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यावर देखील ते मिळून आले नव्हते. मात्र यानंतर तब्बल साडेपाच महिन्यांनी शनिवारी रात्री पाचोडजवळ देशी दारूच्या दुकानाच्या पाठीमागे नाल्यात झाडावर कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची बातमी जनावरे चारणाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, तसेच अंगावर कोणतेच कपडे नव्हते, आजूबाजूला चप्पल व कपड्यांचे तुकडे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता, हा मृतदेह साडेपाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या बबन बेगाजी भोजने यांचा असल्याचे समोर आले.
मृत्यूचे कारण अस्पष्ट!
पंचनामा करून पाचोड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. डॉ. विक्रम ठाकरे यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सपोनि. संतोष माने करीत आहेत. बबन भोजने यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून तपास सुरु...
बबन भोजने यांचा मृतदेह तब्बल साडेपाच महिन्यांनी आढळून आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, तसेच अंगावर कोणतेच कपडे नव्हते, आजूबाजूला चप्पल व कपड्यांचे तुकडे आढळून आले. त्यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. तसेच शवविच्छेदनाच अहवाल नेमका काय येणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. मात्र पोलिसांकडून सर्वच बाजूने तपास करण्यात येत असल्याची माहिती सपोनि संतोष माने यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: