Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


पंतप्रधान मोदी आज राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात सहभागी होणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिविराला संबोधित करणार आहेत. या चिंतन शिबिराचे आयोजन 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी सुरजकुंड, हरियाणा येथे करण्यात आले आहे. या चिंतन शिबिरात विविध राज्यांचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि केंद्रीय पोलीस संघटना (सीपीओ) यांचे महासंचालकही सहभागी होणार आहेत.


मुख्यमंत्री शिंदे आज महाबळेश्वरात


आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वरात असणार आहे. ते आज महाबळेश्वरमध्ये मुक्काम करणार आहेत. तसेच ते संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 


दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 


सत्येंद्र जैन यांनी जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने सत्येंद्र जैन यांच्या जामिनावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे. सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती.


एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची 302 वी बैठक आज पार पडणार


एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची 302 वी बैठक आज पार पडणार आहे. एसटीला 4 हजार गाड्यांसोबतच महागाई भत्ता आणि उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यावर एसटीचा भर असेल. आणखी काय काय एसटीच्या पदरी पडतं? मुख्यमंत्री काय देतात हे बघणं महत्त्वाचं असेल.


एनएचएआयच्या कंपनीची लिस्टिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित 


नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट या एनएचएआयची उपकंपनी असलेल्या कंपनीचे लिस्टिंग पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांची देखील उपस्थिती असेल. बीएसई, सकाळी 8 : 30 वाजता 


मुंबईत यूएनएससी दहशतवाद विरोधी समितीची आजपासून दोन दिवसीय बैठक


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. तर 29 ऑक्टोबर रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत दहशतवाद्यांकडून होत असलेल्या इंटरनेटचा वापर, नवीन पेमेंट सिस्टीम आणि ड्रोनचा सामना करण्याच्या पद्धतींवर चर्चा होणार आहे.


गिरीश महाजन आज धुळ्यात 


राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज धुळ्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे. यामुळे अनेक विषयांच्या कारणावरून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.


आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज अहमदनगर दौऱ्यावर


राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आजअहमदनगर दौऱ्यावर आहेत. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक येथे ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते भाजप नेते राम शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.


आजपासून छठ पर्व सुरु

चार दिवसीय छठ उत्सव आजपासून सुरू होणार आहे.