Sujay Vikhe-Patil : ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला असल्याचेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल
सध्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. NDRF च्या निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणं याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री असल्याचे सुजय विखे पाटील म्हणाले.
शिंदे आणि फडणवीस सरकार पुढील दहा ते पंधरा वर्षे राहणार
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ना होईल हा दुसरा भाग आहे. परंतू त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचं नाव पहिलं निश्चित करावं, असे विखे पाटील म्हणाले. कुटुंबामध्ये कोणाला ते नेतृत्व देताय आणि मग त्यावरती कारवाई करावी. पक्ष जे चालवतात त्यांच्या तोंडून तो निर्णय आला तर त्यावर मी भाष्य करेल असेही विखे पाटील म्हणाले. राहिला प्रश्न अजित पवार यांच्या नेतृत्वाचा, ते या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं काम अतिशय चांगला आहे, त्यांनी नेतृत्व करावं किंवा नाही करावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार असून ते पुढील दहा ते पंधरा वर्षे हटत नाही. ज्यांना पदं वाटून घ्यायची आहेत, त्यांनी घरात बसून आपापसामध्ये वाटुन घ्यावी असा खोचक टोला देखील त्यांनी रोहित पवारांना लगावला.