Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिरसगांव येथील संजय राऊत यांच्या घरावर चोरांनी धुमाकूळ घालत त्यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. यावेळी त्यांच्या पत्नीच्या गळ्यालासुद्धा चाकू लावण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसगांव येथील 26 वर्षीय संतोष संजय राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ते नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. अंदाजे रात्री अकरा वाजता संतोष यांना त्यांच्या आईचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते लगेच जागे झाले. यावेळी त्यांनी उठून पाहिले असता त्यांना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावून उभे असल्याचे पाहायला मिळाले.


अचानक झालेल्या ह्या घटनेने घरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. यावेळी संतोष यांचे वडील संजय राऊत यांनी चोरांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातील एकाने हातातल्या चाकूने त्यांच्या डोक्यावर आणि कंबरेवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात राऊत जखमी झाले आहेत. त्यानंतर या प्रकरणी संतोष संजय राऊत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शिवसेनेचे राऊत हे नव्हे


संजय राऊत हे नाव म्हणजे महाराष्ट्राला शिवसेनेचे घणाघाती नेते म्हणून परिचित आहे. मात्र या बातमीत असलेले संजय राऊत हे ते संजय राऊत नसून वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथील शेतकरी आहे. ते आपल्या कुटुंबासोबत राहतात. दरम्यान त्यांच्या घरावर चोरटयांनी हल्ला केला आहे. त्यांचे नाव सुद्धा शिवसेनेचे राऊत यांच्यासारखे मिळतेजुळते असल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा पाहायला मिळाली. 


दुसऱ्या संजय राऊतांवर उपचार सुरु... 


चोरांनी राऊत कुटुंबाच्या घरात प्रवेश करताच आधी घरातील महिलेच्या गळ्याला चाकू लावून दहशत निर्माण केली. त्यांनतर गुपचूप पैसे आणि दागिने काढून द्या, अन्यथा मारहाण करू, अशी धमकी दिली. संजय राऊत यांच्या खिशातील 10 हजार रुपये आणि त्यांचा पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत चोरांनी पळ काढला.


त्यानंतर संतोष यांनी गावातील पोलीस पाटील व शेजारी असलेल्या लोकांना फोनद्वारे बोलावून घेत झालेल्या घटनेबाबत संपुर्ण माहिती दिली. तसेच संजय राऊत यांना मित्राच्या चारचाकी वाहनाने रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. जबर जखमी असेल्या राऊत यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. घडलेल्या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.