BMC Demolition Action : मुंबईला पूरग्रस्त होण्यापासून रोखण्यासाठी नालेसफाईचे काम जोमात सुरू आहे. तर, दुसरीकडे या नालेसफाई करणाऱ्यांची घरे महापालिकेने जमीनदोस्त केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या आर मध्य विभागाने चिकूवाडी, महावीर नगर, बोरिवली येथील सुमारे 70 सफाई कामगारांचे संसार जमीनदोस्त केले आहे. ही सर्व कुटुंबे पारधी समाजाची आहेत. मागील 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून येथे वास्तव्य करीत आहेत. 


ही सर्व पारधी समाजाची कुटुंबे संपूर्ण वर्षभर बीएमसीच्या कंत्राटदाराकडे "सफाई आणि मातीकाम" करतात. नाले सफाई, गटार बांधणी आणि सफाई, घन कचरा व्यवस्थापन, गणपती विसर्जन तलाव बांधणी, कोविड महामारी दरम्यान आवश्यक स्वच्छता अशा कामांमध्ये या कामगारांचा समावेश आहे.  या शहराला आपले श्रम देणाऱ्या या समाजसमूहाला बीएमसी सुरक्षितता तर देऊ शकत नाही. मात्र त्यांची पत्र्यांची  घरे  जमीनदोस्त केली जात असल्याचा आरोप 'होमलेस कलेक्टिव्ह' या संस्थेने केला आहे. मागील काही दिवसांपासून या कामगारांची घरे तोडण्यात येत असल्यामुळे आधीच गरीब असलेल्या कामगारांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचे संस्थेचे सीताराम शेलार यांनी सांगितले. या पारधी समाजाची मुलं आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत. 


मुंबई महापालिकेच्यामार्फत सध्या बेघर नागरिकांचं सर्वेक्षण केलं जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी निष्कासन केलं जाऊ नये असे नियोजन विभागाचे आयुक्त श्री दिघावकर यांचे आदेश आहेत. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक निष्कासन केलं जात असून त्यामागे प्रशासनातील अधिकाऱ्यांची जातीयवादी मानसिकता असल्याचा आरोप शेलार यांनी केला. 


होमलेस कलेक्टिव्हने वॉर्ड अधिकारी आणि समाज विकास अधिकारी यांना निवेदन भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित अधिकारी व्यस्त असल्याने त्यांच्याकडे निवेदनच देण्यात आले आहे. 


बेजबाबदारपणे कंत्राटी कामगारांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा, सर्व कुटुंबांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, या कामगारांचे पुनर्वसन करून घर द्यावीत अशी मागणी होमलेस कलेक्टिव्ह या मंचाने केली आहे.