Aurangabad Crime News: पैश्यावरुन होणारे वाद आणि भांडण काही नवीन नाही. असे अनेक गुन्हे रोज पोलिसात दाखल होत असतात. मात्र औरंगाबादमध्ये याच पैश्यांच्या वादावरून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. कारण उधारीच्या पैश्यातून झालेल्या वादात क्रुझर जीपचालकाच्या डोक्यात लोखंडी पाइप मारून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. सुधाकर पुंडलिक ससाणे (वय 35 रा. वाघोडा ता. मंठा ह.मु. मंगलमूती कॉलनी, रांजणगाव) असे खून झालेल्या क्रुझर जीपचालकाचे नाव असून, शेख तौफिक शेख रफिक (वय 22, रा. रोहिला पिंपरी, ता. जिंतूर ह.मु. साठेनगर, वाळूज) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर ससाणे हे कुटुंबासह रांजणगाव येथे राहतात. त्यांच्याकडे एमएच 20 ईवाय 5827 क्रमाकांची क्रुझर जीप असून, ते स्वतःजीप भाडेतत्वावर चालवतात. रविवारी सकाळी ते जीप घेऊन घराबाहेर पडले होते. मात्र दोन दिवस उलटूनही ते घरी परतले नाहीत. शिवाय ते मोबाईल फोन उचलत नसल्याने सुभाष ससाणे यांनी 15 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी वाळूज ठाण्यात भाऊ बेपत्ता झाला असल्याची तक्रार दिली होती.


क्रुझर जीपमध्ये आढळला मृतदेह...


दरम्यान या प्रकरणी तपास सुरु असताना बेपत्ता असलेले सुधाकर यांच्या मोबाईलचे लोकेशन गरवारे कंपनीजवळ येत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी रात्री अकरावाजेच्या सुभाष ससाणे यांना सोबत घेऊन लोकेशन येत असलेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांना सर्वेस रोडवर सुधाकर यांची क्रुझर जीप उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ जीपची तपासणी केली असता, मधल्या शिटवर एका बारदाण्यामध्ये सुधाकर यांचा मृतदेह दिसून आला. 


पैशाच्या वादातून खून


सुधाकर यांचे मृतदेह आढळून आल्यावर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. दरम्यान शेख तौफिक शेख रफिक यानेच सुधाकर यांचा खून केला असल्याची माहिती तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर आरोपी शेख तौफिक व मयत सुधाकर ससाणे यांची बऱ्याच दिवसापासून ओळख होती. पैशावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी सुधाकर याने तौफीकच्या तोंडात थापड मारली याचा राग मनात धरून तौफीक याने गॅरेजमधील शॉकअपचा लोखंडी पाईप उचलून सुधाकर यांच्या डोक्यात मारून त्यांना कायमचं संपवलं, असल्याचं देखील समोर आले आहे.


Video: धक्कादायक! रिक्षा चालकाकडून अश्लील प्रश्न, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी