Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, मेहुणीला ब्लॅकमेल (Blackmailing) करून नग्न व्हिडीओ कॉल (Video Call) करण्यास भाग पाडून त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल केल्याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात 21 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमाँ यांनी दिले आहे.
पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या लग्नाआधी दोन वर्षांपूर्वी सुट्यांमध्ये आरोपीचा नऊ वर्षांचा मुलगा पीडितेच्या घरी आलेला होता. तेव्हा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आरोपीने अॅन्ड्रॉईड मोबाइल दिला होता. त्या मोबाइलवरूनच आरोपी पीडितेशी बोलायचा. त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच आरोपीने 'तुझ्या बहिणीला शारीरिक समस्या आहेत. तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवता येत नाहीत. आता तूच माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी फाशी घेईन. मग तुझ्या बहिणीची मुले उघड्यावर येतील,' असे बोलून तिला भावनिक केले.
व्हिडीओ कॉल करून नग्न होण्यास भाग पाडले...
आरोपीने लग्न करण्याची मागणी केली असता पीडिताने लग्नाला नकार देत, माझ्या बहिणीचा संसार बरबाद होईल, तू सांगशील तसे मी करेल' असे म्हणाली. त्यानंतर आरोपीने व्हिडीओ कॉल करून तिला नग्न होण्यास भाग पाडले. त्या व्हिडीओ कॉलचे त्याने स्क्रीन शॉट काढून ठेवले. दरम्यान, पीडितेचे लग्न झाले. मात्र एप्रिल 2022 मध्ये आरोपीने तिच्या अश्लील फोटोंचा आणि व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉटचा एक व्हिडीओ बनविला आणि तो नातेवाइकांना पाठविला.
अखेर पोलिसात गुन्हा दाखल
अश्लील फोटोंचा आणि व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉटचा एक व्हिडीओबाबत पीडितेला माहिती मिळाल्यावर ती काही दिवस शांत राहिली. दरम्यान, 16 सप्टेंबरला आरोपीने पुन्हा त्याचा मित्र आणि पीडितेच्या आतेभावाला व्हिडीओ पाठविले. त्यामुळे अखेर पिडीत महिलेने याप्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
काय सांगता! चक्क मोबाईल टॉवरच चोरीला, औरंगाबादेतील अजब चोरीची गजब कहाणी
बकऱ्याच्या गोठ्यात नेऊन बळजबरीने बलात्कार
दुसऱ्या एका घटनेत अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात 26 वर्षीय महिलेवर गावातीलच व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पिडीत महिलेला तिच्या पती आणि मुलास जीवे मारण्याची धमकी दिली. तर महिलेच्या असहायतेचा फायदा घेत गावाच्या बाहेरील पांधीरस्त्यावर असलेल्या बकऱ्याच्या गोठ्यात नेऊन बळजबरीने बलात्कार केला. तर पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार अजिंठा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.