Congress Inquiry Committee In Aurangabad: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसला लागलेलं भगदाड बुजवण्यासाठी एक चौकशी समिती औरंगाबादच्या दौऱ्यावर पाठवली आहे. तर ही समिती जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची 'मन की बात' जाणून घेऊन अहवाल प्रदेश कमिटीला सादर करणार आहे. 


काँग्रेसला गळती...


गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला औरंगाबाद जिल्ह्यात मोठी गळती लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महत्वाचे नेते काँग्रेसची साथ सोडताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत किशोर बलांडे, केशवराव तायडे, श्रीराम महाजन, अनुराग शिंदे यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी अशी गळती लागू नयेत म्हणून, पटोले यांनी पदाधिकाऱ्यांचा भावना जाणून घेण्याचे ठरवले आहे. 


चौकशी समिती शहरात...


पदाधिकाऱ्यांचा भावना आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जळगावचे आमदार तथा प्रभारी शिरीष चौधरी आणि सहप्रभारी मुजाहिद खान यांना पाठवण्यात आले आहे. रविवारी या दोन्ही नेत्यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये माजी आमदार, खासदार, तालुकाध्यक्ष यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची बैठक घेतली.विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी प्रत्येकाशी इनडोअर चर्चा केली. तसेच या सर्व बैठकीचा आढावा ते प्रदेश कमिटीकडे सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अन् पदाधिकारी मनमोकळेच बोलले...


सत्तेत असून सुद्धा काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे चौकशी समितीसमोर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आपल्या अडचणी थेटपणे मांडल्या. तर काहींनी पक्षातील अंतर्गत राजकारणातून कसे एकमेकांना लांब ठेवले जात आहे, याचे किस्सेच सांगितले. या सर्व चर्चेची रेकॉर्डिंग करण्यात आली असून, अहवालासोबत रेकोर्डिंग सुद्धा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या चौकशी समितीच्या अहवालानंतर नाना पटोले कोणते फेरबदल करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.