Maharashtra Rain : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात कालपासूनच मान्सून सक्रिय झाला असून, जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आज पावसाचा जोर कायम असून जिल्ह्याच्या विविध भागात तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे.


नैऋत्य मान्सून कालच (19 जून 2022) रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारली आहे. 


एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे. जून महिना अर्धा सरला तरी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.


महत्वाच्या बातम्या: