Hasan Mushrif : आज (20 जून) संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या (21 जून) प्रस्थान होणार आहे. दरम्यान, पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागानं पुढाकार घेतला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी 2 कोटी 59 लाख 75 हजार रुपयांचा निधी तर वारकरी, भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरवण्यासाठी 6 कोटी 73 लाख 20 हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यामुळं पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून विविध संतांच्या पालख्यांसोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येतं. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी 2 कोटी 59 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करुन द्यायचा असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. पुणे जिल्हा परिषदेला 82 लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला 20 लाख 25 हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरवण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी 6 कोटी 73 लाख 20 हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. एकूण मंजुरीच्या 20 टक्के प्रमाणात म्हणजेच 1 कोटी 34 लाख 64 हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Ashadhi Wari 2022 : माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना, मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश
- Ashadhi Wari 2022 : मोहिते पाटलांचा मानाचा अश्व 'बलराज'चे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान